महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असताना उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने शहरात मालमत्ता कर वसुलीसाठी थकित मालमत्तेच्या जप्तीची कारवाई सुरू केली आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी काम न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देताच शहरातील दहा झोनमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली.
लक्ष्मीनगर झोनमध्ये विद्याविकास विहार पब्लिक स्कूल व साईबाबा लोकसेवा संस्थेवर कारवाई करण्यात आली. धरमपेठ झोनमध्ये १४ लोकांना नोटीस देण्यात आल्या असून त्यांच्याकडून एकूण १५ लाख ३२ हजार वसूल करण्यात आले. १४ घर मालकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. हनुमाननगर झोनमध्ये १४ लोकांना नोटीस देण्यात आली असून तिघांवर जप्तीची कारवाई केली. नेहरूनगर झोनमध्ये अशोक भागवतकर यांच्या २ लाख ३७ हजार ४२० तर नारायण वानखेडे यांच्याकडे २३ हजार ८२० रुपये असल्यामुळे त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमध्ये ५८ हजार १०५, लकडगंज झोनमध्ये २ लाख वसूल करण्यात आले तर आशीनगर आणि मंगळवारी झोनमध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे गेल्या दोन महिन्यात आर्थिक उत्पन्नचा स्रोत घसरल्यामुळे शहरातील विकास कामे ठप्प आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला बँकेत ठेवण्यात आलेली मुदत ठेव मोडीत काढत कर्मचाऱ्यांचे वेतन केले. ज्यांच्याकडे थकित मालमत्ता आहे. त्यांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी संबंधीत झोनमध्ये जाऊन थकित रक्कम भरावी, असे आवाहन महापालिकेच्या कर विभागातर्फे करण्यात आले आहे.