रबाले येथील झोपडपट्टी वसाहतीत आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील १४० विद्यार्थ्यांची वाहतूक चक्क रुग्णवाहिकेमधून केली जात असून याच रुग्णवाहिकेमधून वेळप्रसंगी मृतदेह देखील वाहून नेले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या भागासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचा नाइलाजास्तव असा उपयोग करावा लागत आहे. या रुग्णवाहिकेमधून दोन किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या संग्रामनगर मधील विद्यार्थ्यांची सकाळ-संध्याकाळ वाहतूक केली जात असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.
राज्यातील अनेक शहरांमधील मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थी गळती लागल्याचे चित्र आहे. नवी मुंबईतील पालिका शाळेत मात्र विद्यार्थी संख्या भरभरून असल्याचे दिसून येते. सुमारे २७ हजार विद्यार्थी नवी मुंबई पालिकेच्या विविध ६३ शाळांमधून शिक्षण घेत आहेत. या शहरात असणाऱ्या रोजगारांच्या संधी, वाढते बांधकाम, राहण्यास मिळणारी जागा आणि मुबलक पिण्याचे पाणी यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे येण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळेच शाळांना विद्यार्थीदेखील चांगले मिळत आहेत. स्कूल व्हिजनच्या नावाखाली शाळांचा विकास केला जात आहे.  नवी मुंबईत एक आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग १८ व १९ मधील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या १४० विद्यार्थ्यांची ने-आण एका रुग्णवाहिकेमधून केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. संग्रामनगर, यादवनगर, चिंचपाडा या झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना या शाळेत पायी तीन ते चार किलोमीटरचे अंतर तुडवत यावे लागत असल्याने येथील माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे यांनी ही शक्कल लढवली आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांना या विभागातील रुग्णसेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक मोठी रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे. रुग्णसेवेच्या वेळी ही गाडी त्यांच्यासाठी तर वापरली जातेच, पण सकाळी धुऊन ती शाळेच्या सेवेतदेखील ठेवली जात आहे. या दोन सेवेबरोबरच विभागात एखाद्या नागरिकाचे निधन झाल्यास पावसाळ्याच्या या दिवसात त्याला स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्याचे कामदेखील याच रुग्णवाहिकेमधून केले जात आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या एका गाडीतून केल्या जात असून आमचा नाइलाज असल्याचे सोनावणे यांनी सांगितले. श्रीमंत शहर, आधुनिक शहर, सायबर सिटी अशी बिरुदावली लावणाऱ्या नवी मुंबईत या विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी एखादी गाडी देणारी दानशूर व्यक्ती मिळत नाही हेच या शहराचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.