राज्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांच्या काम बंद आंदोलनास नाशिकच्या संगणक परिचालक कामगार कर्मचारी संघटनेने पाठींबा दिला आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्य़ातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करून त्याच्यासाठी शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व संगणक परिचालक प्रामाणिक व सेवाभावी वृत्तीने कक्षाचे मिळेल ते काम करत आहेत. मात्र या असहाय्यतेचा फायदा घेऊन शासनाने निर्धारित केलेले आठ हजार रूपये मानधनाऐवजी प्रत्यक्षात ३८०० ते ४१०० रुपये मानधन दिले जाते. तसेच संगणकाची देखभाल, दुरूस्ती व लागणारे छपाई साहित्य कधीही वेळेत मिळत नाही. यासाठी ग्रामपंचायतीला स्वनिधीतून हा दुबार खर्च करावा लागतो. तसेच संगणक कक्ष स्थापन झाल्यापासून कधीही वेळेत मानधन देण्यात आलेले नाही. किंवा मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. जिल्हा व तालुकास्तरावरील बैठकींचा भत्ता व प्रवास खर्च दिला जात नाही. याबाबत संबंधितांचे तक्रार केल्यास सेवेतून कमी करण्याची धमकी दिली जाते, अशी तक्रारही संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सुमारे तीन वर्ष पूर्ण होऊनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. राज्यात २७ हजारपेक्षा अधिक संगणक परिचालक कामगार कर्मचारी म्हणून युवावर्ग कार्यरत आहे. संगणक परिचालकांना शासन सेवेत समाविष्ट करून वेतन श्रेणी लागू करावी, ग्रामपंचायतीमधील संग्राम कक्षात कार्यरत संगणक परिचालकांना कराराप्रमाणे दरमहा आठ हजार रुपये वेतन देण्यात यावे, बैठक भत्ता व प्रवास भत्ता देण्यात यावा, मानधन फरक व थकीत मानधन त्वरित अदा करण्यात यावे, सर्वसंगणक परिचालकांना सन्मानाची वागणूक मिळावी अशी मागणी संघटनेने केली आहे.