ऑटोरिक्षातील बॅगमध्ये चार लाखाचे सोन्याचे अस्सल दागिने पाहून ‘त्या’ला मोह सुटला नाही. ‘त्या’ने ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. या प्रामाणिक ऑटोचालकाचा पोलीस व बॅगधारकाने सत्कार केला. उपराजधानीत सोमवारी घडलेली ही सत्यकथा आहे.
शांता शंकर तेलरांधे (रा. वर्धा) या त्यांची बहीण, सून व नातवासह सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकातून रिक्षाने मानेवाडामध्ये जाण्यास निघाल्या. ऑटोरिक्षात गर्दी असल्याने त्यांनी बॅग ऑटोरिक्षातील मागील भागात ठेवली होती. मानेवाडा येथे त्या उतरल्या. नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर त्यांना बॅग ऑटोरिक्षात विसरल्याचे निदर्शनास आले नि त्यांना धक्काच बसला. रोख साडेतीन हजार, मोबाईल, पाच तोळे सोन्याचा चपलाकंठी हार, चार तोळे सोन्याची कंठी माळ, पाच तोळे सोन्याच्या पाटल्या, पाच ग्रॅम मंगळसूत्र, एकूण १४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे दागिने, असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज त्यात होता. त्यांनी नातेवाईकासह गणेशपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकाचे वर्णन जाणून घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नंदनवार, सहायक निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वाखालील गणेशपेठ पोलीस ठाण्यातील शोध पथकाने फिर्यादी महिलेला सोबत घेतले आणि बसस्थानक गाठले. तेथे आणि तेथून मानेवाडापर्यंत ऑटोरिक्षा चालकांची विचारपूस करून संबंधित वर्णनाचा ऑटोरिक्षा चालक दिसल्यास कळवण्याचे आवाहन केले जात होते. संबंधित ऑटोरिक्षा चालक ओळखीचा असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि ते त्याच्या घरी जायला निघाले.
इकडे ज्या ऑटोरिक्षात बॅग होती तो चालक शेख इक्बाल शेख इब्राहिम (रा. ताजनगर) हा घरी गेला होता. त्याचे मागील भागात लक्ष गेले तेव्हा त्याला बॅग दिसली. ते पाहून त्यात स्फोटके तर नाही, या विचाराने तो काहीक्षण घाबरलाही. त्याने बॅग उघडली असता त्याला धक्काच बसला आणि डोळेही दिपले. आत सोन्याचे दागिने होते. घरी सांगून तो लगेचच पोलीस ठाण्यात जायला निघाला. तेवढय़ात तेथे गणेशपेठ पोलीस पोहोचले. ही बॅग कुण्या प्रवाशाची राहिली असून ती देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असल्याचे सांगत त्याने ती बॅग पोलिसांच्या हवाली केली.