वाळूच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था होते. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वाळूपासून मिळणाऱ्या स्वामित्व शुल्काचा वापर केला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहाला दिली.
वाळू चोरी, रस्त्यांची दुरवस्था, अपघाताचे वाढलेले प्रमाण, पाणी प्रदूषण आदी मुद्दय़ांवर रमेश कदम, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अर्जुन खोतकर आणि इतर सदस्यांनी लक्षवेधी मांडली.
वाळू उपसा आणि जडवाहनांच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था होते.
या रस्त्याची दुरुस्ती करण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. वाळूचा लिलाव करताना कंत्राटदाराला रस्त्यांची दुरुस्ती करण्याची अट घालण्यात येईल, असेही खडसे म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या आपेगावकरुणप्रिपी या पुलाशेजारी मोठा चर खोदून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात आल्याने अनेक ठिकाणी पुलाला तडे गेले आहेत. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते
म्हणाले.