वाशी सेक्टर १७ येथील सिटी बॅंकेसमोरील मुख्य नाल्यात तीन महिन्यापूर्वी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. या तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिला नाल्यात टाकल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आल्याने वाशी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा उकलण्यास अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी तरुणीच्या प्रियकरासह तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे.
अंजली शेटय़े (२७) असे या मृत तरुणीचे नाव आहे. नेरुळ एमआयडीसीमधील मनीष बार अ‍ॅण्ड रेस्टॉंरंटमध्ये ती बारबाला म्हणून कामाला होती. तिचा एका रिक्षाचालकाशी विवाह झाला होता. त्यापासून तिला पाच वर्षांचा मुलगादेखील होता. मात्र त्याच्याशी काडीमोड झाल्याने अंजलीने उदरनिर्वाहासाठी बारमधील नोकरी स्वीकारली होती.
या बारमध्ये नेहमी येणाऱ्या योगेश काळे (२५) या तरुणाशी दीड वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. सीबीडीमध्ये राहणारा योगेश हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. ह्य़ा पेशातून बाहेर पडू पाहणाऱ्या अंजलीने योगेशला लग्नासाठी गळ घालण्यास सुरुवात केली होती. मात्र लग्न करण्यास त्याने नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या अंजलीने त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्याच्या घरी सांगण्याची धमकी योगेशला दिली होती. तसेच स्वत:च्या मुलालादेखील तिने त्याच्याकडे सोपवले होते.
मात्र योगेश लग्नाच्या नकारावर ठाम होता. या प्रकरणी योगेशचे मित्र सचिन मोरे (३५, रा.कामोठे) आणि अंकुश काटकर (२७, रा.गोवंडी) यांनीदेखील अंजलीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही अंजलीने लग्नासाठी तगादा लावल्याने योगेश वैतागला होता. अखेर तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने सचिन आणि अंकुशच्या मदतीने तिच्या खुनाचा कट रचला. मित्राला अंजलीच्या त्रासापासून मुक्तता मिळावी या हेतूने त्या दोघांनीही या कटाला सहमती दर्शवली होती.
ठरल्याप्रमाणे योगेशने २६ डिसेंबर २०१३ रोजी फिरायला जायचे सांगत रात्रीच्या वेळेस तिला कारमधून वाशीत आणले. यावेळी कारमध्ये सचिन आणि अंकुशदेखील होता. या दोघांनाही ती ओळखत असल्याने तिला संशय आला नाही. वाशी सेक्टर १७ येथील नाल्याजवळ त्याने कार थांबवली. यानंतर तिला मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर तिच्याच ओढणीच्या साह्य़ाने तिचा गळा आवळून तिला ठार मारून तिचा मृतदेह नाल्यात टाकून पळ काढला होता. दुसऱ्या दिवशी साडेपाचच्या सुमारास अंजलीचा मृतदेह नाल्यात तरंगत असल्याचे एका वाटसरूने पाहिल्यावर वाशी पोलिसांना त्याची माहिती दिली होती.
तिची ओळख न पटल्याने या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर १५ एप्रिल रोजी गुन्हे शाखेचे पोलीस नाईक परशुराम केंगारे यांना खबऱ्याकडून या गुन्ह्य़ातील आरोपी योगेश आणि त्याचे मित्र सानपाडा येथील नीलम बारमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, साहाय्यक पोलीस निरीक्षक सी.बी.लांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष शिंदे, पोलीस नाईक किरण राऊत, पोलीस हवालदार दत्तात्रय भगत आणि पोलीस शिपाई दिनकर भास्करे यांच्या पथकाने या बारजवळ सापळा लावला होता.
सचिन आणि अंकुश यांच्यासह बारमध्ये आलेला योगेश पोलिसांच्या सापळ्यात अडकला. योगेशने या गुन्ह्य़ाची कबुली पोलिसांना दिल्यानंतर या तिघांन्ही अटक करण्यात आली. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पठारे हे करीत आहेत.