उन्हाळा आला की, आंब्याच्या अवीट गोडीची आठवण येणे स्वाभाविक असले तरी शहरात वेगवेगळ्या जातींच्या फळांची फसवणूक करण्यासाठी लागलेली स्पर्धा बघता त्यात आंब्यासह विविध फळांना सामावून घेतले जात असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. मोठय़ा प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची बाजारात विक्री केली जात आहे. विशेषत आंबा पिकवण्यासाठी विक्रेत्यांकडून कॅल्शियम काबाईड या पदार्थाचा वापर केला जात असताना त्याकडे मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावते आहे.
यावेळी वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठय़ा प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले असले तरी बाहेर राज्यातून येथील कळमनासह विदर्भातील विविध बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या जातींचे आंबे विक्रीला आले आहेत. उन्हाळा म्हणजे आंबा चखायचाच एवढेच माहिती असलेल्या ग्राहकाला आंबा नेमका कोणत्या प्रकारचा आहे, ते ओळखणे कठीण झाले आहे. बाजारात रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर, बेगमपल्ली, अशी आंब्यांची नावे घेऊन दुकानदार विक्री करीत आहेत. बाजारात ८०० ते १२०० रुपये किलोप्रमाणे हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. त्यातही कच्चा माल स्वस्तात आणून त्यात रासायनिक औषधे वापरून विकला जातो. आंब्यासह सर्व प्रकारची रासायानिक पदार्थ वापरून पिकनलेली फळे आरोग्यास किती अपायकारक आहे, याचा विचार मात्र आपण करीत नाही. असे आंबे ओळखणे मात्र कठीण झाले आहे. हापूस आंब्याच्या नावाखाली सर्रास बेगमपल्ली आंब्यांची विक्री केली जात आहे. गेल्या वर्षी अन्न व औषधी प्रशासनाने कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवलेला तब्बल १९०० किलो आंबा कॉटन मार्केट परिसरातील फळबाजारातून पकडल्याने सध्या विक्रीस आलेला आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेला तर नाही ना, या शंकेमुळे ग्राहकांची चलबिचल आता वाढणार आहे.
सर्वसाधारणपणे अक्षय्य तृतीयेपासून आंबा चाखायला सुरुवात केली जाते. यंदा मात्र अक्षय्य तृतीया आली तरी नैसर्गिकरित्या पिकलेला पुरेसा आंबा बाजारात विक्रीलाच आलेला दिसत नाही. पूर्ण तयार न झालेला, काहीसा हिरवा आणि कच्चा आंबा मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो.
काही ठिकाणी पिकलेला आंबा आहे. मात्र, तो नैसर्गिकरित्या पिकवलेला असेल की रासायनिक द्रव्य वापरून, या प्रश्नाने ग्राहक विचारात पडत आहेत. त्यामुळे पूर्ण न पिकलेला आंबा खरेदी करून घरीच त्याची अढी घालून तो पिकवण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसते.

मुलांच्या मेंदूवर परिणाम – डॉ. खळतकर
या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर म्हणाले, फळे पिकविण्यासाठी रासायनिक औषधांचा उपयोग केला जात असून तो  लहान मुलांसाठी अतिशय घातक असतो. या कॅल्शियम औषधांपासून अ‍ॅसिटीलीन नावाचा वायू तयार होतो. त्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. लवकर पिकवलेली फळे खाल्ली, तर ताप येणे, मळमळ करणे, उलटय़ा होणे, जुलाब लागणे, आदी परिणाम होतात.
कळमना बाजार असो. अध्यक्ष राजेश छाबरिया म्हणाले, कळमना बाजारपेठेमध्ये रत्नागिरी, आंध्रप्रदेश, कर्नाटकातून आंबा मोठय़ा प्रमाणात विक्रीला आलेला आहे. साधारणात रोज १०० ते १५० ट्रक माल येतो. बाजारात हापूस आंबाही मोठय़ा प्रमाणात आलेला आहे. गेल्या काही दिवसात रासायनिक औषधांचा वापर फार कमी केला जातो आणि काही विक्रेते करीत असले तरी ग्राहकांना देताना तो स्वच्छ करून देतात.
अन्न व औषधी विभागाचे न.र. वाकोडे म्हणाले, कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेले आंबे बाजारात आल्याची माहिती असेल तर आम्ही कारवाई करतो. या संदर्भात बाजारात मोहीम राबविली जात आहे.