मकरसंक्रांतीला मांजामुळे पक्ष्यांच्या जखमी होण्याचा पक्षीप्रेमी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी कसा उपयोग करुन घेतील, याचा नेम नाही. नागपुरातही अशा प्रसिद्धीलोलूप पक्षीप्रेमींचे सध्या पीक आले असून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर समाज माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी जाहिरातबाजी सुरू केली आहे. वास्तविक, पतंग उडवताना मांजात अडकून पक्षी मृत्यूमुखी पडण्याचा किंवा जखमी होण्याचा प्रकार कमी आहे. मात्र, मकरसंक्रांतीला आलेले अशा पक्षीप्रेमींचे पीक, मकरसंक्रांतीनंतर झाडांवर अडकून राहिलेल्या मांजामुळे पक्षी जखमी झाले असताना किंवा मृत्युमुखी पडले असताना कुठे जाते, हे कळायला मार्ग नाही.
उडत्या पतंगांच्या मांजाने पक्षी जखमी झाला आणि मृत्यूमुखी पडला, याचे प्रमाण फार कमी आहे. यावर्षी चायनीज मांजावरच न्यायालयाने संक्रांत आणल्याने तसाही बाजारातला याचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या जखमी होण्याचे प्रमाणही गेल्या वर्षीच्या तुलनेत बरेच कमी आहे. दरवर्षीसुद्धा पक्ष्यांच्या जखमी होण्याचे प्रमाण ४० ते ५० इतके असते, पण यापेक्षा पक्ष्यांच्या जखमी होण्याचा जास्त आकडा हा मकरसंक्रांत संपल्यानंतरच असतो. झाडांवर, इमारतींवर वर्षभर अडकलेला चायनीज मांज्याचे विघटन होत नाही आणि या विघटन न झालेल्या मांज्यात पक्षी वर्षभर अडकून जखमी होतात. मात्र, मकरसंक्रांतीला ऊतू चाललेल्या स्वघोषित स्वयंसेवींचे प्रेम नंतर कुठे जाते, हे कळत नाही. नागपुरातील अशाच काही स्वघोषित स्वयंसेवींनी सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरून ‘पक्ष्यांचे सुटका केंद्र’ अशी जाहिरातबाजी सुरू केली आहे. मांजामुळे जखमी झालेला पक्षी आढळल्यास नागरिकांनी आमच्याकडे आणून द्यावा, असे आवाहनही त्यावर केले आहे. नागरिकांनाच जर जखमी पक्षी आणून द्यायचा असेल तर मग ते ‘पक्ष्यांचे सुटका केंद्र’ नव्हे, तर ‘पक्ष्यांचे पुनर्वसन केंद्र’ म्हणायला हवे.
जखमी पक्षी घेऊन नागरिकांना यांच्याकडे धावायचे असेल, तर यांना आपले दुकान थाटण्याचाही अधिकार नाही. मकरसंक्रांतीला पक्ष्यांच्या जखमी होण्याची किंवा मृत्युमुखी पडण्याची वाट पाहण्यापेक्षा वर्षभर झाडांवर आणि इमारतींवर अडकलेला आणि विघटित न झालेला मांजा काढण्याची बुद्धी यांना सुचत नाही. त्यात अडकलेले जखमी पक्षीही त्यांना दिसत नाहीत. मकरसंक्रांतीला मात्र एक पक्षी जरी अडकला तरी दहा पक्षी अडकल्याचे सांगून प्रसारमाध्यमांकडे फोटोसह बातमी पाठवली जाते. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरून त्या पक्ष्यासह छायाचित्र प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे पक्ष्यांच्या जीवावर प्रसिद्धी बळकावणाऱ्या या प्रसिद्धीलोलूप पक्षीप्रेमींना आवर घालण्याची वेळ आता आली आहे.