शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात सातत्याने आंदोलनाचे सत्र राबवणारा भाजप आणि या पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी राज्यात पक्षाने सत्ताग्रहण केल्यानंतर या विषयावर मात्र काही बोलण्यास तयार नसल्याचे अधोरेखित होत आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात याच पक्षाचे आमदार आहेत. मागील काही महिन्यांत गुन्हेगारीचा आलेख उंचावत असूनही भाजपचे तिन्ही आमदार मूग गिळून बसले आहेत. भाजप विरोधी पक्षात असताना विद्यमान आमदारांनी अनेक आंदोलने केली होती. मात्र आता गुन्हेगारी आटोक्यात आणण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्यामार्फत काही हालचाल होत नसल्याचे दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी जाळपोळ, खून, हाणामाऱ्या, टोळक्यांचा धुडगूस, टोळी युध्द, गोळीबार, लुटमार अशा घटनांनी धगधगणाऱ्या नाशिकची ओळख ‘गुन्हेगारांचे शहर’ होण्याच्या मार्गावर होती. पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक राहिला नव्हता. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची ओरड करण्यात येत होती. तेव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ढासळणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून तत्कालीन सरकार आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरले होते. वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालावा यासाठी अनेकदा आंदोलनही केले. तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर परिस्थितीत काही बदल झाले. पोलीस ठाण्यात होणारा राजकीय हस्तक्षेप कमी झाला. काहिशी आशादायी बनलेली ही स्थिती मागील काही महिन्यांपासून झपाटय़ाने खालावत आहे. गत काही दिवसांचा विचार केल्यास वाहन जाळपोळीच्या अनेक घटना घडल्याचे लक्षात येते. खूनाचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. काही महिन्यात खुनाच्या आठ ते नऊ घटना घडल्या. रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना मारहाण करून लुटमारीचे प्रकार सुरू आहेत. बालकांच्या अपहरणाचे प्रकार घडले. महिलांच्या अंगावरील सोन साखळी खेचून नेण्याचे इतके प्रकार घडले की, या गुन्ह्यांत राज्यात नाशिकचा क्रमांक अव्वल ठरू शकतो. दुचाकीवर येऊन सोनसाखळी खेचून नेणाऱ्या चोरटय़ांनी आता बनावट पोलीस असल्याची बतावणी करत लुटमारीचा नवीन मार्ग शोधला आहे.
चोरी, घरफोडी, वाहने लंपास करणे या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व आणि नाशिकरोड-देवळाली विधानसभा मतदारसंघात घडणाऱ्या या घटनांबद्दल संबंधित आमदार अनभिज्ञ आहेत की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. भाजपच्या आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आणि आ. बाळासाहेब सानप यांनी विरोधात असताना पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग नोंदविला होता. गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्यावरून तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि शासनाला दोषी ठरवले होते. विरोधात असताना आक्रमकपणे आंदोलन करणारा भाजप आणि या पक्षाचे पदाधिकारी आता गुन्हेगारी घटना वाढत असताना मौन बाळगून आहेत. शिवसेनेचे आमदार योगेश घोलपही त्यास अपवाद ठरलेले नाहीत. वास्तविक, सत्ताधारी लोकप्रतिनिधी गुन्हेगारी आटोक्यात राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला काही सूचना करू शकतात. परंतु, तसेही काही घडल्याचे दिसले नाही. उलट काही दिवसांपूर्वी बाळासाहेब सानप यांनी एका हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याचे समजल्यावर स्वत: पोलिसी काम करण्याचा प्रयत्न केला. एका दाम्पत्याला संशयावरून सानप समर्थकांनी धक्काबुक्की केली होती. हा आततायीपणा त्यांच्या अंगाशी आल्यावर मग हे प्रकरण दडपण्यात आले. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मौन बाळगणारे भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कधी प्रयत्न करणार, हा प्रश्न आहे.