घर किंवा कार्यालयामधील सामान नवीन ठिकाणी पोहचविण्याचे काम एखाद्या पॅकिंग मूव्हिंग कंपनीकडे सोपवणार असाल तर सावधान! कारण नामांकित कंपनीच्या नावाशी नामसाधम्र्य साधून ग्राहकांची फसवणूक करण्याचा बोगस मूव्हिंग कंपनींचा गोरख धंदा  सध्या तेजीत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून ग्राहकांनी त्यांच्याकडे सामान सोपविल्यास त्यांच्यावर अखेर पश्चात्तापाची वेळ येते. कारण सामान ताब्यात घेतल्यानंतर ठरलेल्या व्यवहारापेक्षा अधिक रकमेची मागणी त्यांच्याकडून केली जाते. ती रक्कम न मिळाल्यास सामान पोहचविले जात नाही. अशाच एका बोगस मूव्हिंग कंपनीचे सत्य नवी मुंबईत उजेडात आले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या भामटय़ांचा शोध घेत आहेत.
तुभ्र्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला असलेले खारघर येथील राहणारे हितेश अरोरा यांची काही दिवसांपूर्वी बदली दिल्ली येथील हॉटेलच्या एका शाखेत झाली. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातील सर्व सामान आणि कार दिल्ली येथे पाठविण्यासाठी त्यांचा मेहुणा प्रवीण नरियानी याला सांगितले होते. त्यांच्या मेहुण्याने हे काम एका नामांकित पॅकिंग मूव्हिंग कंपनीकडे सोपवले होते. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान त्या कंपनीकडून आलेल्या ट्रक (एमएच०४-डीएच-१२१६) मध्ये घरातील सामान भरण्यात आले. तसेच त्यांची व्ॉगनर कार दुसऱ्या वाहनातून पाठविण्याची थाप मारून ट्रकसोबत आलेला कर्मचारी ती कार घेऊन गेला. मात्र पाच दिवसांनंतरदेखील सामान व कार दिल्लीला न पोहचल्याने प्रवीण यांनी कंपनीचे कर्मचारी अभिजित आणि सुनील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक पैशांची मागणी त्याच्याकडून करण्यात आली. तसेच पैसे भर तेव्हाच सामान मिळेल अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. प्रवीण याने या विरोधात पोलिसांत तक्रार करू असे सांगितले असता, पोलीस ठाण्यात गेलास तर तुला मारून टाकीन अशी धमकी त्या कर्मचाऱ्यांनी दिली. यानंतर ९ ऑगस्ट रोजी दिल्लीला अरोरा यांच्या घरी सामान पोहचले.मात्र अद्यापही कार न पोहचल्याने अखेर प्रवीण यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत या विरोधात तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचे कर्मचारी अभिजित आणि सुनील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू करत संबंधित कंपनीशी संपर्क साधला असता, या नावाचे कोणतेही कर्मचारी त्याच्याकडे कामाला नसल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पत्त्यावर कंपनीचे कार्यालयदेखील नसल्याचे समोर आले. संकेतस्थळावरील नावदेखील त्या नामांकित कंपनीच्या नावाशी मिळतेजुळते असल्याचे समोर आल्याने आरोपीने बोगस कंपनी सुरू करून अरोरा यांची फसवणूक केली असल्याचे यातून उघड झाले आहे. या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.एन.नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कशी होते फसवणूक
सध्या वेळेअभावी अनेक जण घरातील किंवा कार्यालयातील सामान स्थलांतरित करण्यासाठी मूव्हिंग कंपनीशी संपर्क साधतात. सदर कंपनीचे कर्मचारी तुम्ही दिलेल्या पत्त्यावरून सामान घेऊन ते इच्छितस्थळी सुरक्षितरीत्या पोहचवतात. यामुळे अशी सेवा पुरविणाऱ्या कंपनींकडे हे काम सोपविण्याकडे अधिक कल वाढत आहे. या सेवा पुरविणाऱ्या अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत. याचाच फायदा घेत नामांकित पॅकिंग मूव्हिंग कंपनीच्या नामसाधम्र्य साधून संकेतस्थळ सुरू केले जाते. यानंतर या कामासाठी ग्राहकांना त्यांचा संपर्क क्रमांक मिळावा यासाठी सध्या प्रचलित असलेल्या दूरध्वनी क्रमांक पुरविणाऱ्या ऑनलाइन फोन डिरेक्टरी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे जादा शुल्क भरून नोंदणी केली जाते. यामुळे घरातील सामान किंवा कार्यालयातील सामान स्थंलातरित करण्यासाठी कोणत्याही ग्राहकांनी क्रमांक पुरवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधल्यास प्राधान्याने या बोगस कंपनीचा संपर्क क्रमांक दिला जातो. यावर ग्राहकांनी संपर्क साधल्यावर त्यांना सेवा पुरवली जाते. त्यांच्याकडून सामान दुसऱ्या ठिकाणी पोहचविण्यासाठी घेतले जाते. यानंतर मात्र ठरलेल्या व्यवहारापेक्षा अधिक रकमेची मागणी ग्राहकाकडून करण्यात येते. ती रक्कम न दिल्यास सामान पोहचवले जात नाही. संकेतस्थळावर असलेल्या पत्त्याच्या आधारे ग्राहकांनी त्यांच्या कार्यालयाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास त्या ठिकाणी त्या कंपनीचे कार्यालय नसल्याचे समोर येते.