एअर इंडियाच्या विमान देखभाल व दुरुस्ती केंद्राच्या (एमआरओ) र्सवकष चाचणीसाठी बोईंग विमान मिहानमध्ये चार दिवस मुक्कामी राहणार आहे.
बोईंग कंपनीने भारताला विमान विकताना केलेल्या करारानुसार ‘एमआरओ’ उभारून देण्याचा करार केला आहे. त्यानुसार मिहानमध्ये एमआरओ सज्ज झाले असून, त्याच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात बोईंगचे पहिले विमान एमआरओमध्ये चाचणीसाठी आले आणि पाच तासांनी परत गेले होते. यावेळी एमआरओमध्ये चार दिवस विमान ठेवण्यात येणार असून, विद्युत पुरवठा, विद्युत यंत्रणा, देखभाल आणि दुरस्तीसाठी आवश्यक जागा तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येत आहे. एमआरओ सुसज्ज असून, बोईंगने ते एअर इंडियाच्या ताब्यात दिले आहे. आवश्यक सर्व परवानग्यादेखील प्राप्त झाल्या असून एमआरओ उद्घाटनच्या प्रतीक्षेत आहे.
बोईंग ७७७-३०० ईआर हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावर उतरले. त्यानंतर ते विशेष ट्रॅक्टरद्वारे ३.४ किमी अंतराच्या ‘टॅक्सी-वे’वरून एमआरओमध्ये नेण्यात आले. शिवणगावाकडे जाणाऱ्या मार्गाला विमानतळ आणि  एमआरओ जोडणारा ‘टॅक्सी-वे’ क्रॉसिंग आहे. विमानाला एमआरओकडे नेताना शिवणगाव मार्ग बंद करण्यात येतो.   
मिहानसाठी एमआरओ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. आशिया खंडातील विमान देखभाल आणि दुरुस्तीचे हे एक मोठे केंद्र आहे. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्विसेस लि. या कंपनीकडे एमआरओ चालविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून या केंद्राच्या उद्घाटनाविषयी उत्सुकता आहे. मागील महिन्यात एक चाचणी आणि आता चार दिवस देखभाल आणि दुरुस्ती केंद्राची र्सवकष चाचणी घेण्यात आहे. यामुळे पुन्हा एमआरओचे उद्घाटन जून महिन्यात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान देखभाल व दुरुस्ती केंद्र  ५० एकर जागेत आहे. बोईंगने १०७ दशलक्ष डॉलर खर्च करून प्रकल्प उभारला आहे. येथे दोन ‘हँगर’ आहेत. त्यात चार मोठी विमाने आणि सहा छोटी विमाने एकाचवेळी उभी केली जाऊ शकतात.
देश-विदेशातील विमानांची दुरुस्ती
या एमआरओद्वारे देश आणि विदेशातील विमानांना देखभाल आणि दुरुस्तीची सेवा देण्याचे उद्दिष्टय़ आहे. नागपूरपासून पाच तासांच्या हवाई अंतरावर अनेक देशाची विमानतळे आहेत.