युती आणि आघाडी तुटल्यामुळे दोन नवे पर्याय समोर आल्याने निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अनेकांच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागल्याचे चित्र आज विदर्भात बघायला मिळाले. पळवापळवीचा हा सामना असा काही रंगला की कोण कोणत्या पक्षात हेच क्षणभर कळेनासे झाले. यामुळे मतदानासाठी सज्ज असलेल्या मतदारांचे भरपूर मनोरंजन झाले.
राज्यात गेल्या २५ वर्षांपासून युती तर १५ वर्षांपासून आघाडी अस्तित्वात असल्याने दरवेळी निवडणूक आली की अनेक इच्छुकांचा हिरमोड व्हायचा. काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीतील इच्छुकांची घुसमट ठरलेली असायची तर भाजपच्या वाटय़ाला आलेल्या मतदारसंघात सेनेतील इच्छुकांची कुचंबणा व्हायची. हाच अनुभव काँग्रेस व भाजपमधील इच्छुकांना सुद्धा यायचा. आता युती व आघाडी तुटल्यामुळे इच्छुकांना दोन ऐवजी चार पर्याय उपलब्ध झाले. त्याचा फायदा घेत आज विदर्भातील अनेक इच्छुकांनी कुंपणावरून उडय़ा मारायला सुरुवात केली. विदर्भात भाजप व काँग्रेसच्या तुलनेत शिवसेना व राष्ट्रवादीची ताकत कमी आहे. त्यामुळे या दोन पक्षांना उमेदवार मिळणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला होता. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हीच चिंता सतावत होती. मात्र, अनेक इच्छुकांनी समोर येत सेना व राष्ट्रवादी नेत्यांना बराच दिलासा दिला. गुरुवारी रात्री युती व आघाडी तुटली आणि आज शुक्रवारी या चारही पक्षात पोळा फुटायला सुरुवात झाली. केवळ  युती व आघाडी तुटली नाही तर हे चारही पक्ष मोठय़ा प्रमाणात फुटले. गुरुवारी रात्री आघाडी फुटल्याची घोषणा करणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आज सकाळी नागपुरात आले. त्यांनी आकाशवाणी चौकातील एका लॉनमध्ये चक्क दरबारच थाटला. पक्षाने उमेदवारी नाकारली का, मग या इकडे एबी फार्म घेऊन जा, असे निमंत्रण जाहीरपणे दिले गेले. शिवसेनेचे शहर प्रमुख शेखर सावरबांधे यांना युती तुटताच इतकी घाई झाली की त्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच पक्षाचे चार उमेदवार जाहीर करून टाकले. उमेदवारांना इतर पक्षांनी पळवू नये यासाठी ही तत्परता दाखवण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्ज दाखल केला पण, त्यांचे सारे लक्ष कुणाला कुठून उभे करायचे याकडेच लागले होते. तिकडे गडकरीवाडय़ावर तर इच्छुकांची तोबा गर्दी उसळली होती. उमेदवारी हवी असे म्हणत पदस्पर्श करणाऱ्या प्रत्येकाला पारखून घेत वाडय़ावर तातडीने निर्णय घेतले जात होते. त्याचबरोबर आणखी कोणता मोठा मासा गळाला लागतो का याचीही चाचपणी केली जात होती. काँग्रेसने शहरातील तसेच विदर्भातील काही उमेदवार जाहीर केल्याने या गोटात थोडी शांतता होती. काँग्रेसमधील अनेक इच्छुक दुसऱ्या यादीची वाट बघत होते. ज्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही त्यांनी वेगळी वाट धरली, पण त्यांची समजूत काढण्याच्या फंदातही कुणी काँग्रेस नेता पडायला तयार नव्हता. राष्ट्रवादीने साथ सोडल्याने विदर्भातील १४ जागा काँग्रेसला अधिकच्या मिळाल्या. त्यासाठी उमेदवार शोधण्याचे काम मुंबईतून केले जात होते. या पळवापळवीच्या राजकारणात काहींचे नशीब अचानक उजळले तर काहींचे फुटले. दत्ता मेघेंचे पुत्र समीर मेघेंना भाजप पश्चिम नागपुरातून उमेदवारी देणार अशी चर्चा असल्याने विद्यमान आमदार सुधाकर देशमुख अस्वस्थ होते. मात्र आज महालातल्या वाडय़ातून मेघेंना हिंगण्यातून उमेदवारी देण्याचे ठरले व ध्यानीमनी नसताना तेथील आमदार विजय घोडमारेंचा पत्ता कट झाला. अमरावतीचे सुनील देशमुख राष्ट्रवादीकडून लढणार हे गुरुवारी ठरले. आमदार रवी राणा त्यांचा एबी फार्म घेऊन नागपूरहून निघाले आणि देशमुख भाजपत प्रवेश करण्यासाठी अमरावतीहून नागपूरला आले. राष्ट्रवादीत असलेले राजुराचे सुदर्शन निमकर व अमरावतीच्या सुरेखा ठाकरे उमेदवारीसाठी एक दिवसापूर्वी शिवसेनेत गेले. आघाडी तुटताच हे दोघेही राष्ट्रवादीत पुन्हा परत आले. काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले डॉ. नामदेव उसेंडी, दीनानाथ पडोळे या आमदारांना तसेच माजीमंत्री वसुधा देशमुखांना या फुटीमुळे लगेच दुसरा पर्याय उपलब्ध झाला. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजप व काँग्रेसमधील शेकडो इच्छुकांची आज अक्षरश: धावपळ सुरू होती. तुम्ही देत नाही ना, मग जातो तिकडे अशीच भाषा सर्वत्र ऐकायला येत होती. या गदारोळात पक्ष, निष्ठा या साऱ्यांचा विसर अनेकांना पडल्याचे दिसून आले. लढणे महत्त्वाचे पक्ष व निष्ठेचे नंतर बघू असाच दृष्टिकोन राजकारणात सक्रिय असलेल्या साऱ्यांनी बाळगला आहे, या वास्तवाचे दर्शनही आज झाले. राज्यात प्रभाव असलेल्या चार प्रमुख पक्षांनी युती व आघाडी करून इच्छुकांचे आजवर नुकसानच केले असा तर्क काढावा असेच चित्र आज विदर्भात होते. मोक्याच्या क्षणी खुंटा बदलवण्याच्या या प्रकाराला मतदार कसा प्रतिसाद देतात हेच आता बघायचे पण, तूर्तास सर्वाचे मनोरंजन मात्र झाले.