देशभर प्रचाराचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल माध्यमांचा वापर होत असताना ठाणे जिल्ह्य़ातील चार मतदारसंघांमध्ये त्याचा प्रभावी वापर करून घेण्यात उमेदवार कमी पडत असून प्रमुख पक्षांचे उमेदवार या प्रचारापासून दूर आहेत तर अनेक उमेदवारांना या सोशल माध्यमाची माहितीच नसल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. कल्याणमधील सोशल साइटवरील प्रचारासाठी मोठा उत्साह आहे तर जिल्ह्य़ातील भिवंडी आणि पालघरच्या उमेदवारांमध्ये सोशल माध्यमाबद्दल प्रचंड अज्ञान आणि अनास्था आहे.
गेल्या दशकात जन्म घेतलेल्या सोशल साइट्सनी नागरिकांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले असल्यामुळे अनेक सामाजिक प्रश्नांवर आपले विचार मांडण्याबरोबरच जनसंपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून या साइट्स ओळखल्या जाऊ लागल्या. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये याचा वापर सुरू झाला असला तरी अनेकांपर्यंत हे माध्यम अजूनही पोहचलेले नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केलेल्या २६ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांचे सोशल साइट्सचे खातेच नाही तर ज्यांची आहेत त्यापैकी बहुतेकांची अनेक दिवसांपासून वापरातच नाहीत. ठाण्यातील मनसे उमेदवार अभिजीत पानसे, शिवसेनेचे राजन विचारे यांची फेसबुक खाती रोज वापरात असली तरी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचे खाते अनेक महिन्यांपासून वापरात नसल्याचे दिसून आले आहे. ठाण्याच्या तुलनेत कल्याणमध्ये सोशल माध्यमांचा वापर उमेदवारांच्या प्रचारामध्ये प्रभावीपणे वापरला जात असून त्यासाठी उमेदवारांच्या टेक्नोसॅव्ही कार्यकर्ते आक्रमकपणे काम करत आहेत. कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक खात्यावरून प्रचाराचा बार उडवला आहे. २०१० साली त्यांनी हे खाते उघडले असले तरी त्याचा वापर मात्र प्रामुख्याने गेल्या दोन महिन्यांपासून अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांची दोन फेसबुक खाती असून एक पेजही आहे. त्यामध्ये प्रचाराचे फोटो, रॅली आणि विविध मान्यवरांच्या भेटीगाठीचे फोटो रोज अपलोड केले जात आहेत. मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फेसबुकवर एक पेज बनवले असून त्याला सर्वाधिक लाइक्स मिळावे यासाठी विशेष प्रचार मोहीमच फेसबुकवर अवलंबली होती. ज्यामुळे हे पेज केवळ दीड महिन्यात सुमारे १ लाख जणांनी लाइक्स केले आहे. त्या तुलनेत आनंद परांजपे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ऑनलाइन पाठीराख्यांची संख्या कैक पटीने कमी असल्याचे दिसत आहे.
भिवंडीमध्ये उमेदवारी अर्ज भरलेल्या १३ उमेदवारांपैकी ११ उमेदवारांची सोशल साइट्सवर खातीच नाहीत. एका उमेदवाराने तर सोशल खाते या रकान्यात चक्क आपल्या बँकेचे नाव आणि खाते क्रमांक दिल्याने या उमेदवारांचे अज्ञान समोर आले आहे. भिवंडीतील कँाग्रेस, मनसे आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचे सोशल साइट्सवर अकाऊंट नाही. पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची परिस्थितीही अशीच असून १० पैकी एकाही उमेदवाराचे सोशल साइटवर खाते नसल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. पालघरमध्ये सोशल नेटवर्किंग साइटवर दिलेली प्रतिक्रया आणि त्याला दिलेल्या पाठिंब्यावरून निर्माण झालेला वाद सर्वश्रृत असताना येथील उमेदवार मात्र या माध्यमापासून दूर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील पाच उमेदवारांकडे केवळ इमेल खाते आहे.