आजच्या धावपळीच्या युगात घराचा उंबरठा ओलांडलेली गृहलक्ष्मी ‘सुपर वुमन’ झाली. यशाची शिखरे पादाक्रांत करताना ‘घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी..’ अशीच काहीशी तिची स्थिती असते. कामाच्या गडबडीत आपल्या बाळाकडे लक्ष देता येत नाही ही नोकरी करणाऱ्या बहुतांश महिला कर्मचारी-अधिकाऱ्यांची सल. ही बाब लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी आडगावच्या आपल्या मुख्यालयात पाळणाघराची खास व्यवस्था केली आहे. पोलीस दलाच्या अभिनव संकल्पनेला महिला कर्मचाऱ्यांकडून मात्र थंड प्रतिसाद लाभल्याचे चित्र आहे.
पोलीस दलाच्या कामाचे स्वरूप पाहता कामातील अस्थैर्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या गडबडीत महिला कर्मचारी-अधिकारी घरातील तसेच बाहेरील या दोन्ही पातळीवर सक्रिय असल्याने त्यांना शारीरिक तसेच मानसिक दोन्ही पातळीवर सक्षम राहणे गरजेचे ठरते. ग्रामीण पोलीस दलात जिल्ह्य़ातील ३६ पोलीस ठाण्यात ६००हून अधिक महिला कार्यरत आहेत. त्यातील आडगावच्या नाशिक ग्रामीण मुख्यालयातील ५० महिलांचाही समावेश आहे. महिला कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करत त्यांना कामाच्या ठिकाणी स्वतंत्र विश्रांती कक्ष, प्रसाधनगृह आदींची व्यवस्था केली जात आहे. दुसरीकडे, महिला कर्मचाऱ्यांच्या एक ते सात वयोगटांतील बालकांसाठी ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसरात स्वतंत्र पाळणाघर तयार करण्यात आले आहे. कामाच्या धावपळीत बालकांचे योग्य संगोपन व्हावे या दृष्टीने पाळणाघराची संकल्पना मांडण्यात आली. पाळणाघराची औपचारिकता न पाळता मुलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना येथील वातावरण प्रसन्न, आल्हाददायक वाटावे, ते येथे रमावेत या दृष्टीने खोली सजावटीपासून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वी या पाळणाघराचे उद्घाटन करण्यात आले होते. पाळणाघरासाठी पूर्ण वेळ आयाची नियुक्ती करण्यात आली असून पोलीस कल्याण निधीतून व्यवस्थापनाचा खर्च केला जात आहे. तसेच मुलांना बाहेरून भेटायला कोण येते, त्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी महिला पोलीस निरीक्षकाची यावर देखरेख आहे.
पाळणाघरात निरनिराळ्या कार्टून्स चित्रांसह काही रंगबेरंगी फुले रेखाटण्यात आली आहे. मुलांसाठी सायकल्स, मुलींचा भातुकलीचा खेळ, फळा, विविध शैक्षणिक तक्ते यांसह खेळण्यातून मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अशा काही निवडक बाबींचाही समावेश आहे. खेळ-संस्कार यांचा मिलाफ कसा साधता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निश्चितपणे काम करता यावे या दृष्टिीकोनातून साकारलेल्या पाळणाघरात सध्या केवळ तीन बालके आहेत. महिला कर्मचाऱ्यांची संख्या आणि पाळणाघराचा लाभ घेणारी मुले यांचे प्रमाण पाहिल्यास विरोधाभास लक्षात येतो. पोलीस दलातील काम म्हणजे इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शासकीय नोकरी नाही. अविरतपणे कार्यरत राहणारे हे दल आहे. महिला पोलिसांचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राबविलेली ही अभिनव संकल्पना आज निव्वळ शोभेचे बाहुले ठरली. मधल्या काही काळात पाळणाघरात एकही बालक नव्हते. मात्र महिला कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक सोय म्हणून ती आजपर्यंत कायम ठेवण्यात आली. पाळणाघर सुरू झाल्यापासून आजवर ३०हून अधिक बालकांनी त्याचा लाभ घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.महिला कर्मचाऱ्यांना पुरेशा सोयी-सुविधा मिळत नाही अशी तक्रार नेहमी केली जाते. परंतु, ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घेण्याकडे पाठ फिरविली जात असल्याचे हे पाळणाघर पाहिल्यावर लक्षात येते.