नवी मुंबईतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेली वाशीतील श्रद्धा अपार्टमेंट ही इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. या जर्जर, शरपंजरी पडलेल्या इमारतींच्या जागी नवीन इमारत उभी राहणार असल्याने या इमारतीतील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. अडीच एफएसआयअंतर्गत रहिवाशांना आजच्यापेक्षा मोठी घरे मिळणार आहेत. या इमारतीतील ३६८ पैकी ११२ रहिवासी गेली १५ वर्षे संक्रमण शिबिरात राहात आहेत. नवी मुंबईतील वाढीव एफएसआयचा प्रश्न संपूर्ण राज्यात गाजलेला आहे. सिडकोने बांधलेल्या घरांची अल्पवधीत जर्जर स्थिती झाल्याने त्यांना वाढीव एफएसआय देऊन पुनर्बाधणी केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. भाजप सरकारने तो वाढीव अडीच एफएसआय गेल्या महिन्यात जाहीर केला. दोन्ही सरकारच्या प्रयत्नामुळे का होईना प्रश्न अखेर सुटला आणि सव्वा लाख रहिवाशांचा जीव भांडय़ात पडला. मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींतील रहिवासी हे सानपाडा, जुईनगर येथील संक्रमण शिबिरात दिवस काढत आहेत. त्यामुळे त्यांच्या नवीन घराचे स्वप्न महत्त्वाचे असून त्यांना आपल्या घराची ओढ लागलेली आहे. अशाच वाशी सेक्टर दहामधील श्रद्धा अपार्टमेंटमधील ३६८ रहिवाशांपैकी ११२ रहिवासी गेली १५ वर्षे जुईनगर येथे संक्रमण शिबिरात आहेत. त्यातील १५ रहिवाशांनी तर नवीन आणि मोठय़ा घराचे स्वप्न पाहत जीव सोडला. त्यामुळे उर्वरित रहिवाशांसाठी पुन्हा घरटय़ात परतण्याचा आनंद हा वेगळाच आहे. त्यामुळे सोसायटीच्या सहमतीने रविवारी या अर्पाटमेंटमधील पहिली इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
या इमारतींची पुनर्बाधणी अडीच एफएसआयने होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा आराखडा तयार आहे. दोन वर्षांत पुन्हा या ठिकाणी इमारत उभी राहणार आहे. सोसायटींनीे यापूर्वीच पुनर्बाधणीचे प्रस्ताव पालिकेच्या नगररचना विभागाकडे सादर केले असून ते प्रलंबित आहेत. अडीच एफएसआयसाठी शासनाने १५ मीटर रुंदीच्या रस्त्याची अट घातली आहे. ही इमारत पाडल्यांतर त्या ठिकाणी १५ मीटर रुंदीचा रस्ता सोडून पुनर्बाधणी करता येणार आहे. यामुळे येथील रहिवासी आनंदी असून त्यांनी पेढे वाटून दुसऱ्या दिवशीदेखील गुढीपाडवा साजरा केला.
शासनाने केवळ सिडकोनिर्मित इमारतींसाठी हा एफएसआय मंजूर करून एका शहरातील दोन नागरिकांमध्ये दुजाभाव तयार केला आहे. धोकादायक इमारत ही काय खासगी आणि शासकीय बघून तयार होते काय? त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर हा एफएसआय सर्वाना जाहीर होण्याची आवश्यकता आहे. आम्ही आता त्यासाठी लढा उभारणार असून खासगी इमारतींनादेखील वाढीव एफएसआय मिळायला पाहिजे यासाठी संघर्ष करणार असल्याचे माजी नगरसवेक किशोर पाटकर यांनी स्पष्ट केले.