मुंबईत अन्यप्रांतीय मंडळी बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे करतात आणि पालिका त्यांना यथावकाश अधिकृतही करून घेते. मात्र कांदिवली पश्चिम येथे साईबाग इस्टेटमधील चाळीत १९५९ सालापासून राहाणाऱ्या आणि आता घर मोडकळीस आलेल्या तीन मराठी कुटुंबांना महापालिकेकडून घराच्या दुरुस्तीची परवानगीही गेली दहा वर्षे मिळालेली नाही. अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांना या घरांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची करुण कहाणी समजली आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांना घर दुरुस्तीची परवानगी देण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपायुक्त मराठे यांनी दुरुस्तीचे लेखी आदेश दिले खरे; परंतु स्थानिक विभाग अधिकारी मोटे यांनी उपायुक्तांचा आदेश धाब्यावर बसवून काम थांबविण्याचा आदेश देण्याचा पराक्रम केला. यामुळे हे सर्व ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले असून न्यायासाठी मनिषा म्हैसकर यांच्या दारापुढे उभे आहेत.
कांदिवलीच्या एम.जी. रोडवरील साईबाग इस्टेटमध्ये राधाबाई भायखळकर चाळ गेली ५४ वर्षे उभी आहे. हेमलता सुर्वे, शेवंती रहाटे आणि मधुकर देसाई हे तेथील रहिवाशी आज पंचाहत्तरीमध्ये पोहचले आहेत. सुमारे दोनशे चौरस फुटांची घरे दुरुस्त करून मिळावी यासाठी त्यांनी मालकाला अनेक वर्षे विनंती केली. तसेच २००४ पासून महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे सतत्याने परवानगीसाठी अर्ज सादर केले. मात्र महापालिकेच्या निर्दयी अधिकाऱ्यांनी कधी मालकाची ना हरकत परवानगी आणा, कधी स्ट्रक्टरल इंजिनियरकडून परवाना आणा, अशा मागण्या करीत दुरुस्तीची परवानगी देण्यात टाळाटाळ केली.
दरम्यानच्या काळात या चाळीच्या आसपासच्या मोकळ्या जागेत एक अनधिकृत जैन मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून या तीन मराठी कुटुंबाच्या हालाला पारावार राहिला नाही. जैन मंदिराच्या धनशक्तीपुढे या वृद्ध व गरीब मराठी माणसांचा आवाज लुळा पडत गेला. अखेरचा प्रयत्न म्हणून आपली करूण काहाणी अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्यापुढे त्यांनी मांडली. म्हैसकर यांनीही सर्व कागदपत्रे व पुरावे पाहून पालिका उपायुक्त मराठे यांना दुरुस्तीच्या बांधकामास परवानगी देण्याचे आदेश दिले. मराठे यांनीही तात्काळ सर्व सहकार्य करत दुरुस्तीची लेखी परवानगी २४ मे २०१३ रोजी दिले. मात्र त्यानंतर घडले ते अविश्वसनीय असेच होते.
दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करताच स्थानिक विभाग अधिकारी विश्वास पांडुरंग मोटे यांनी उपायुक्तांचा आदेश धाब्यावर बसवून काम बंद करण्याचे आदेश दिले. तसेच उपअभियंता बाबरेकर आणि चाकणे या उपअभियंत्यांना तेथे पाठवून काम थांबविण्याचे आदेश दिले. लेखी आदेश देण्याची मागणी करताच या अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व कामच तोडून टाकतो, अशी धमकी दिल्याचे या तिन्ही वृद्ध लोकांनी अतिरिक्त आयुक्त तसेच आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहून कळवले आहे. मनिषा म्हैसकर यांच्याशी दूरध्वनी करून हा सर्व प्रकार सांगताच त्यांनी उपायुक्त मराठे यांना तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले. येथील अनधिकृत जैनमंदिर आजही जागेवर आहे. पालिका अधिकारी त्याचे योग्यप्रकारे संरक्षण करतात आणि अवघ्या तीन वृद्ध मराठी माणसांना देशोधडीला लावण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ उद्योग करतात. शिवसेनेचे उपविभाग अध्यक्ष विजय भोसले यांना ही घटना कळताच त्यांनी येथे धाव घेतली असली तरी सत्तेने मस्त असलेल्या पालिका अधिकाऱ्यां3ना सरळ करण्याची हिम्मत पालिका आयुक्त कुंटे दाखवणार का, हा खरा सवाल आहे.