कळंबोली शहरातील विजेच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. कळंबोली सेक्टर १६ ते २० येथील परिसरातील वीज गेल्या चार दिवसांपासून दररोज सायंकाळी चार ते सहा तास गायब होत आहे. सणासुदीच्या काळात परिसरात पसरलेल्या अंधारामुळे येथील वीज ग्राहक महावितरणच्या कारभाराला वैतागले आहेत.
शहरात २५ हजारांहून अधिक वीज ग्राहक आहेत. सेक्टर १६ ते २० हा परिसर रोडपाली नोड म्हणून ओळखला जातो. या परिसरात टोलेजंग इमारती आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्त्यांवरील पथदिवे आणि घरात विजेचा अभावामुळे हा परिसर दुर्गम भाग म्हणून ओळख निर्माण करीत आहे. महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर पाहतो, करतो, प्रयत्न सुरू आहेत अशी वेळ मारून नेणारी उत्तरे वीज बिल वेळीच भरणाऱ्या ग्राहकांना मिळत असल्याने ते वैतागले आहेत. दहीहंडीच्या रात्रीही असाच अंधार कळंबोली परिसरात पसरला होता. कळंबोली शहरातील वीज ग्राहकांची मागणी लक्षात घेता या परिसराला २५ एमव्हीए विजेची गरज आहे. मात्र येथे १५ एमव्हीए वीज प्राप्त होते. रात्रीच्या विजेच्या जास्तीच्या मागणीमुळे हा परिसर अंधारात असतो.
याबाबत कळंबोलीचे महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अमित पालवे म्हणाले की, तीन दिवसांपासून विजेच्या विविध समस्यांमुळे रोडपाली परिसरातील वीज गेली होती. नवीन बसविलेल्या रिलेची क्षमता व्यवस्थित केल्यानंतर तेथील विजेची समस्या दूर करण्यात आली आहे. तळोजा येथून वीजवाहिनी टाकण्यासाठीच्या हालचालींसाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कळंबोलीत उपकेंद्राची क्षमता वाढविली जाईल. त्यानंतर कळंबोलीची वीज समस्या संपूर्णपणे मुक्त होईल.