काँग्रेसचे शहर अध्यक्ष, माजी महापौर व सत्तारूढ महाआघाडीचे अध्यक्ष मदन भरगड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. यंदा झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी जात पडताळणी समितीने कारणे दाखवा नोटीस बजावून सहा गंभीर त्रुटींवर त्यांना ६ जानेवारीपर्यंत खुलासा मागितला आहे.
अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस शहर अध्यक्ष व माजी महापौर मदन भरगड यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेत भाजपच्या उमेदवाराने चौकशीची मागणी केली होती. या मागणीनुसार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार भरगड यांच्या जाती दावा प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात शालेय व गृह चौकशी करून पुन्हा तपासणीकरिता समितीस आदेश दिला होता. उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील दक्षता पथकाने शालेय व गृह चौकशी केली. या चौकशी अहवालात सहा गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. यात मदन भरगड यांनी वडील अशिक्षित असल्याचे नमूद केले होते, पण भरगड यांनी दक्षता पथकाला सादर केलेल्या पुराव्यात वडिलांचा शालेय पुरावे सादर केला होता, या आशयाची बातमी लोकसत्ताने प्रकाशित केली होती. चौकशी समितीने खुलासा विचारतांना हा मुद्दा अग्रक्रमाने विचारला आहे. अर्जदाराने अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्यात व शाळेच्या दाखल खारीज रजिष्टरवर हिंदू व त्यापुढे लिहिलेले गुजर हे अक्षर वेगळ्या हस्ताक्षरात असल्याची बाब उजेडात आली आहे.