महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था द्वारा संचालित कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन्सने महिलांच्या उच्च शिक्षणात नाव प्रस्थापित केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फर्मेशन अ‍ॅन्ड टेक्नालॉजी या क्षेत्रात महाविद्यालय प्रसिद्धीस आले असून विद्यार्थिनींनी केलेल्या प्रयोगामुळे विज्ञान क्षेत्रात एक नवीन आशा निर्माण झाली आहे.
रुग्णांच्या बुद्धीनुसार चालणारी व्हीलचेअर तयार करण्यात या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे. अंतिम वर्षांच्या जीविता हवेलीकर, हिप्सीबा गोस्की, सायली दाभाडे आणि सोनाली पाटणकर यांनी रुग्णांच्या बुद्धीच्या इशाऱ्यावर चालणारी स्वयंचलित व्हीलचेअर तयार केली आहे. त्यांच्या प्रकल्पासाठी प्रा. अजय टिंगुरिया व पल्लवी कवाडे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. कापसाच्या तंतूत नायट्रोजन किती प्रमाणात आहे, हे पाहण्याचा एक प्रयोग अनघा वानखेडे, सुरभी श्रीखंडे व वृषाली फुलझेले या विद्यार्थिनींनी केला.
केंद्रीय कापूस संशोधन प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अंबाती रवींद्र राजू यांनी या प्रयोगाचे विशेष कौतुक केले. व्हच्र्युअल कॅम्पसची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रीती व पायल कुंभलकर या विद्यार्थिनींनी एक अभिवन संगणकीय प्रोग्राम तयार केला.
या साठी प्रा. सुषमा सातपुते व प्रिया मालखेडे यांनी मार्गदर्शन केले. कारखाने आणि वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी गोमुत्राचा प्रयोग इंधन म्हणून करण्याचा एक यशस्वी प्रयोग वैदेही चिंचोळकर, श्वेता भायलोट व प्रतीक्षा दलाल या विद्यार्थिनींनी केला.
योगेश दांडेकर व प्रदीप सारगावकर यांनी या प्रयोगासाठी मार्गदर्शन केले. या विविध अभिनव प्रयोगांसाठी विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात येत आहे.