उरण ते अलिबागदरम्यान करंजा रेवस ही जलप्रवास सेवा सुरू असून या जलप्रवासाला पंधरा मिनिटे लागतात. या प्रवासासाठी पूर्वी ७ रुपये ५० पैसे आकारले जात होते. त्यात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने वाढ करून १२ रुपये ५० पैसे तिकीट दर केला आहे. मात्र अनेकदा जलसेवा चालकाकडून या मार्गावरील प्रवाशांना तिकीट न देताच पैसे घेतले जात आहेत. तसेच बहुतेक प्रवाशांनी १३ रुपये दिल्यानंतर प्रवाशांना सुट्टे ५० पैसे परत दिले जात नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची होणारी लूट थांबविण्याची मागणी प्रवाशांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दररोज अडीच ते तीन हजारांपेक्षा अधिक प्रवासी करंजा ते रेवसदरम्यान प्रवास करीत आहेत. रायगड जिल्हा परिषद व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून ही जलसेवा नियंत्रित केली जाते. काही महिन्यांपूर्वी आर. एन. इंटरप्राईजेस या संस्थेला या जलसेवेचे काम देण्यात आलेले आहे. त्यानंतर या प्रवासाच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आली आहे.प्रवाशांचा तिकीट दरवाढीला विरोध नसून प्रवाशांना तिकीट मिळावे अशी अपेक्षा असल्याची माहिती महेश घरत या प्रवाशाने व्यक्त केली आहे. तसेच प्रवाशांकडून जादा रक्कम घेऊन सुविधाही पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे करंजा ते रेवसदरम्यानच्या प्रवाशांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी केली आहे. या संदर्भात करंजा विभागाचे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी नितीन कोळी यांच्याशी संपर्क साधला असता जलसेवेकडून प्रवाशांना नियमित तिकीट दिले जात असून पैसे घेऊन तिकीट दिले जात नाही असे आम्हाला आढळले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात जलसेवा चालक आर. एन. इंटरप्राईजेसशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.