‘मॅजेस्टिक गप्पा’मधील  परिसंवाद
एखाद्या साहित्यकृतीचा वाचक आणि चित्रपटाचा प्रेक्षक यांच्यात ममलभूत फरक असतो. त्यामुळे एखादी साहित्यकृती वाचकांकडून प्रेक्षकांकडे नेताना दिग्दर्शकाने हे भान राखले पाहिजे, असे प्रतिपादन लेखक रमेश इंगळे-उत्रादकर यांनी विलेपार्ले येथे मॅजेस्टिक गप्पांमध्ये व्यक्त केले.
‘साहित्यकृती आणि चित्रपट’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. इंगळे-उत्रादकर यांच्यासह या परिसंवादात राजीव पाटील, सुजय डहाके, गणेश मतकरी हे सहभागी झाले होते. रविराज गंधे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
दिग्दर्शक राजीव पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, साहित्यकृती बद्दलचा लेखन करताना लेखकाचा आणि चित्रपट दिग्दर्शित करताना दिग्दर्शकाचा दृष्टीकोन हा वेगळा असू शकतो. ही दोन्ही माध्यमे वेगळी असून काही ठिकाणी दिग्दर्शकाने लेखकाला गृहीत धरणे अपेक्षित असते तसेच लेखकानेही त्याच्या साहित्यकृतीवर चित्रपट तयार करताना दिग्दर्शकाला थोडी सवलत द्यावी.
डहाके म्हणाले की, ‘शाळा’ सारख्या गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट तयार करणे आव्हानात्मक काम होते. कादंबरीच्या आशयाला, विषयाला, पात्ररचनेला आणि मांडणीला अजिबात धक्का न लावता लेखकाने तयार केलेली पात्रे आपण पडद्यावर साकारली. मतकरी यांनी, दिग्दर्शकाने साहित्यकृतीचा अभ्यास करूनच चित्रपटाची पटकथा तयार करावी, असे सांगितले.