नागपूर जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे झाली तरी, त्यांना निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित द्यावा, अशी मागणी नागपूर जिल्हा परिषद पेन्शनर महासंघाच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे यांना केली. हे प्रकरण लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन बोंदरे यांनी शिष्टमंडळाला दिले.
प्राथमिक स्वास्थ्य केंद्र नवेगाव (खैरी) येथील कनिष्ठ सहायक कोवे हे ३१ ऑगस्ट २०११ रोजी सेवानिवृत्त झाले. तीन वर्षे पूर्ण झाले तरी त्यांना सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळाला नाही. ग्रामीण पुरवठा योजनेतील एन.एन. नेगी गेल्या तीन महिन्यापूर्वी निवृत्त झाले. वाहनचालक आर.जी. दाढे यांचेही प्रकरण गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित आहे. परिचारिक इंदू मून (वर्ग ४) यासुद्धा निवृत्त होऊन चार महिने झाले. कामठी पंचायत समितीमधून केंद्र प्रमुख या पदावरून बी.एल. वैद्य सेवानिवृत्त झाले.
या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन केसेस प्रलंबित असल्याकडे बोंदरे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. येत्या आठवडय़ात या सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. बोंदरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महासंघाचे कार्याध्यक्ष एन.एल. सावरकर, सरचिटणीस सी.बी. दातारकर, के.जी. दाढे, जी.ए. कापसे, मदन वाहने, अशोक कावडकर, जियाऊद्दीन, एम. सलामे यांचा समावेश होता.