दुष्काळग्रस्त भागात खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्च व एप्रिल महिन्यांत खाणावळीचे पैसे देता यावेत, या साठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमधून सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर  विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये, या साठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाजार समित्यांच्या कार्यकर्त्यांना ‘अन्नछत्र’ सुरू करण्याचे आदेश मंगळवारी दिले. जिल्हास्तरावरून विद्यार्थ्यांची यादी मिळवून अन्नछत्र सुरू केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका मुलीने गरिबी व दुष्काळामुळे शेतात पिकले नाही, त्यामुळे एक वेळ जेवण घेऊन शिक्षण घेत असल्याची कैफियत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासमोर मांडली होती. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीच्या वतीने वेल्फेअर ट्रस्ट सुरू केला. मार्च व एप्रिलमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मदत करता यावी, म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मंगळवारी विखे यांनी विद्यार्थ्यांसाठी बाजार समित्यांमार्फत ‘अन्नछत्र’ सुरू करणार असल्याचे सांगितले.
मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्याचा बाजारपेठेवरही परिणाम आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठ प्रशासनानेही आपत्कालीन विद्यार्थी सहायता निधी उभारण्याचे ठरविले. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी एक दिवसाचा पगार आवर्जून दिला. अशा प्रकारचा सहायता निधी कायमस्वरूपी असावा, असाही विद्यापीठ प्रशासनाचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी वसतिगृहास दिलेली भेट, त्यांना जाणवलेली समस्या यामुळे एक योजना पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आली.
तथापि, शैक्षणिक शुल्क माफ करा या मागणीकडे मात्र सर्वानीच कानाडोळा केला. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ केले आहे. ही रक्कम तुलनेने कमी आहे. पदव्युत्तर व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासाच द्यायचा असेल, तर शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी वारंवार वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांकडून केली जाते. तथापि, त्याकडे लक्ष न देता पक्षीय झेंडा उंचावता यावा, या साठी राष्ट्रवादीकडून दोन हजार रुपये तर काँग्रेसकडून अन्नछत्राच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.