यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी विविध संस्था व संघटनांसह शाळांनीही पुढाकार घेतला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासून होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचा संदेश देत येथील देवळाली हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब आणि भूगोल विभागाचा जिओ क्लब यांच्या वतीने तसेच पंचवटीतील शांताई केदार ज्ञान विकास ग्राम संस्था संचालित गुरुकुल अकादमी या इंग्रजी माध्यम शाळेत शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्यात आली.
देवळाली हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात मूíतकार आनंद तांबट यांनी शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मूर्ती तयार केल्या. उत्कृष्ट मूर्ती तयार करणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाचे साहाय्यक संचालक प्रवीण पाटील, मुख्याध्यापिका चंद्रप्रीती मोरे, पर्यवेक्षक हेमंत मोजाड, हरितसेना प्रमुख किशोर शिंदे यांचीही उपस्थिती होती. ‘ग्रीन महाराष्ट्र’ प्रकल्पाव्दारे राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी शाळांमधील हरितसेना-इको क्लबच्या विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रथम सत्रात आयोजित कार्यक्रमात  सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रकाश पाटील यांनी केले. प्रारंभी हरित श्रावणमास स्पर्धामधील भित्तीचित्र तसेच पर्यावरणपूरक राख्यांच्या प्रदर्शनाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हरितसेना प्रमुख किशोर शिंदे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. शालेय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. आभार महेश आढाव यांनी मानले.
पंचवटीतील गुरुकुल अकादमीत आयोजित शाडू मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेत अशोका युनिव्हर्सलचे कलाशिक्षक अविनाश वडघुले यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शाडूच्या मातीचा उपयोग करून विद्यार्थी व शिक्षकांनीही मूर्ती तयार केल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तीमुळे पर्यावरण संतुलन बिघडते. त्यामुळे जलप्रदूषण होऊन आरोग्यास हानी पोहोचते याची माहिती वडघुले यांनी दिली.