वेळ सकाळी साडेनऊची. महात्मा गांधी रस्त्यावर वाहने उभे करून पदाधिकारी व कार्यकत्यांची आतमध्ये जाण्याची एकच लगबग. आतमध्ये आलेला प्रत्येक जण महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून छायाचित्र काढून घेण्यात मग्न. हा कार्यक्रम आटोपल्यावर काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी थांबण्याची तसदी न घेता आल्यापावली माघारी फिरणे योग्य समजले. तर, प्रामुख्याने महिला अन् इतर कार्यकर्त्यांमध्ये काही काळ निवडणुकीच्या गप्पांचा फड रंगला. साधारणत: पुढील दीड ते दोन तासांत गर्दीने फुललेले कार्यालय पुन्हा शांत झाले
शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या काँग्रेस कार्यालयात गुरुवारी दिसलेले हे चित्र. सध्या हेच कार्यालय आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांचे प्रचार कार्यालय आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवशी खच्चून भरलेले हे कार्यालय त्यानंतर अनेकदा सुनेसुने भासत असे. गुरुवारची सकाळ मात्र त्यास अपवाद ठरली. शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वत्सलाताई खैरे, नगरसेवक उद्धव निमसे, लक्ष्मण जायभावे यांच्यासह काही पदाधिकारी दाखल झाले. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सध्या मंडप टाकलेला आहे. महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम याच ठिकाणी झाला. फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यात आले. पुढील अर्धा ते पाऊण तास पदाधिकारी व कार्यकर्ते येत होते. नगरसेवक शाहू खैरे हे त्यापैकीच एक. ते जसे आले, तसे अभिवादन करून क्षणार्धात अंतर्धान पावले. दरम्यानच्या काळात सिडकोतील काही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. जायभावे यांनी संबंधितांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, एक पदाधिकारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर जायभावे संतापले. तेव्हा कुठे तो शांत झाला.
शहराध्यक्षा बोरस्ते यांनाही प्रचाराची गडबड असावी. त्यांनी काही वेळात सर्वाचा निरोप घेऊन कार्यालय सोडले. मुख्य कार्यालयात काही पदाधिकारी वगळता बहुतेक महिला व पुरुष कार्यकर्ते बाहेरील मंडपात खुच्र्यावर बसले होते. काही जण पेपर वाचण्यात मग्न तर काही गटा-गटाने गप्पात रंगलेले. विदर्भासह देशात ज्या ज्या ठिकाणी मतदान झाले. तेथील मतदानाच्या टक्केवारीबद्दल कोणी बोलत होते. तर, काही महिला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लावलेल्या पताकांविषयी नाराजी व्यक्त केली. पताकांवर केवळ शरद पवार व राष्ट्रवादीचे चिन्ह आहे. त्यावर सोनिया गांधी यांचेही छायाचित्र संयुक्तपणे टाकता आले असते, हा त्यांचा चर्चेचा विषय. काँग्रेस आघाडीच्या संयुक्त प्रचाराविषयी फारसे कोणी काही बोलत नव्हते. काही कार्यकर्ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे वाहनाची विचारणा करत होते. तर, काही अन्य वेगवेगळ्या बाबींची. प्रचाराचे सर्व नियोजन राष्ट्रवादी भवन आणि भुजबळ यांच्या बंगल्यातून होत असल्याचे उत्तर देत पदाधिकारी आपली सोडवणूक करून घेत होते. काँग्रेसच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रवादीने खास प्रतिनिधीची नियुक्ती या कार्यालयात केली आहे. प्रचार फेरी, पदयात्रा, बैठक आदी कार्यक्रमांची माहिती संबंधितामार्फत काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दररोज लघुसंदेशामार्फत पाठविली जाते. जमलेले कार्यकर्ते हळूहळू बाहेर पडू लागले. साडेअकरा वाजेपर्यंत बरेचसे कार्यालय रिकामे झाले. त्याबद्दल विचारणा केल्यावर सेवादलाचे अध्यक्ष लक्ष्मण धोत्रे यांनी सकाळी आठपासून वॉर्डावॉर्डात प्रचार सुरू होत असल्यामुळे हे कार्यालय शांत असल्याचे सांगितले. प्रत्येकाला आपापल्या कामांची जबाबदारी आधीच सोपविली गेली आहे. दिवसभरात कोणी दिसत नसले तरी सायंकाळी सर्व एकत्र जमतात, अशी पुष्टी काहींनी जोडली. दोन-चार नगरसेवक व काही काँग्रेसचे पदाधिकारी वगळता गुरुवारी फारसे कोणी फिरकले नाही. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या तेरा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसच्या कार्यालयात प्रचाराची धामधूम मात्र पहावयास मिळाली नाही.

चहाच्या माध्यमातून स्नेहाचा सेतू
नाशिक शहरातील काँग्रेस कार्यालयास आघाडी उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याचे रुपडे एकदम पालटले. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अलिशान मंडप उभारण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरण्यात आले आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांच्या पूर्वाश्रमीच्या चहा व्यवसायाला प्रचाराचे तंत्र बनविले आहे. त्यावरून ‘चाय पे चर्चा’ असे कार्यक्रम, उमेदवारी अर्ज भरताना चहावाल्याला अनुमोदक बनविणे हा त्याचाच एक भाग. चहाच्या माध्यमातून स्नेहाचा सेतू साधला जातो असे गृहीतक त्यामागे असावे. याचा विचार आघाडीने गांभीर्याने केल्याचे जाणवते. कारण, या कार्यालयात दोन ते तीन दिवसांपूर्वी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चहाची तृष्णा भागविण्यासाठी खास नवीन यंत्र बसविण्यात आले आहे. राष्ट्रवादीने हे यंत्र उपलब्ध करून दिल्याचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. उमेदवार आघाडीचा असूनही काही काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचारापासून दूर राहात असल्याने चहाच्या माध्यमातून काँग्रेसशी स्नेहाचा सेतू बांधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतो. मंडपात आसनस्थ होण्यासाठी मोठय़ा संख्येने खुच्र्याही मांडण्यात आल्या आहेत. परंतु, त्यादेखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रतीक्षा करत असल्याचे लक्षात येते.