मालवणीतील म्हाडा संकुलात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजलेली असली तरी पालिका डॉक्टरांच्या मते डेंग्यूचे रुग्ण मोठमोठय़ा खासगी रुग्णालयांत अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळेच त्यांची नेमकी संख्या समजत नाही. मात्र डेंग्यू रोखण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाप्रमाणेच नागरिकांनीही आपल्या परिसरात कुठेही पाणी साचू न देण्याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अगदी थंड पेयांच्या बुचात साठलेल्या पाण्यातही डेंग्यूच्या डासांची पैदास होते, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. डेंग्यू फैलावणारा डास प्रामुख्याने दिवसा चावा घेतो. त्यामुळे अनेक कॉर्पोरेट कार्यालयात डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळण्याची शक्यता आहे. या रुग्णांची नोंद होत नसल्याने डेंग्यूच्या मोठय़ा प्रादुर्भावाची कल्पना येत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. हिंदुजा, लीलावती, अंबानी, जसलोक आदी रुग्णालयांत असे रुग्ण असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पालिका रुग्णालयांत डेंग्यूग्रस्त  रुग्णांची संख्या तशी मर्यादित आहे. किंबहुना थंडी सुरू झाली की, हे डास जगत नाहीत. उन्हाळ्यातच या डासांची अधिक पैदास होते. त्यातही फवारणी केल्यानंतर हे डास मरतात. झोपडपट्टी परिसरातून मोठय़ा प्रमाणात फवारणी होणे आवश्यक आहे. त्याचवेळी लोकांनीही कुठेही पाणी साचू न देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. सात दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साचले तर या डासांची पैदास होते, हे लक्षात घेतले पाहिजे.