शहरापासून जवळच असलेल्या मातोरी येथील गायरान जमीन खरेदी प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून स्थानिक ७२ शेतकऱ्यांनी या व्यवहाराविरोधात चालविलेल्या आंदोलनामागे विवा हायवे प्रायव्हेट लिमिटेडचे अशोक कटारिया हे असल्याचा आरोप केला आहे. या व्यवहारात फसवणूक झाल्याकडे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे नातलग आदींनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता मातोरीतील ७२ शेतकऱ्यांनी उपरोक्त व्यवहारात कोणतीही फसवणूक झाली नसल्याचा दावा केला आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत या जमिनीवर डोळा असणाऱ्या कटारिया यांनी गावातील एका राजकीय पदाधिकाऱ्यासह काही लोकांना हाताशी धरून फुस लावण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप केला आहे.
बनावट दस्तावेज तयार करून मातोरी येथील २०४ एकर जमीन पंच व दलालांनी राजकीय मंडळींना विकत ग्रामस्थांची फसवणूक केली असून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनाच्या विरोधात याच गावातील अन्य शेतकऱ्यांनी बुधवारी आंदोलन करत उपरोक्त जमीन व्यवहार राजीखुशीने झाला असल्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास सादर केले आहे. २०४ एकर जमिनीची खरेदी वैशाली पिंगळे, सोनिया सोनवणे, राजाराम बस्ते, अजय बोरस्ते आदींना स्वखुषीने दिली आहे. परंतु, विवा हायवे प्रा. लि.चे अशोक कटारिया या विकासकाचा त्या जमीनवर आधीपासून डोळा आहे.
याआधीही ही जमीन कमी किंमतीत घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु, तो वेळीच लक्षात आल्यामुळे अयशस्वी झाल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे गावातील बोटावर मोजता येतील अशा लोकांना हाताशी धरून न्यायालयात खटले दाखल करणे, पोलिसात तक्रार देणे यासाठी फुस लावण्याचा उद्योग कटारिया यांनी आरंभला असल्याचा आरोप या आंदोलक शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे.
सर्व शेतकऱ्यांनी राजीखुशीने आपली जागा विक्री केली आहे. या व्यवहारात कोणतीही फसवणूक झाली नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांना एक रुपयाही न देता कटारिया यांच्याशी संबंधित पंडितराव कातड-पाटील आणि दिलीप आव्हाड यांनी न्यायालय व पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारींच्या आधारे आमच्या जमिनीचा काडीमोल किंमतीत व्यवहार करू पाहत असून तो शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने या विषयात लक्ष घालून पंडितराव कातड-पाटील, दिलीप कातड, रामदास पिंगळे आदींपासून वाचवावे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी काडीमोल भावात घेऊ पाहणाऱ्या कटारिया यांच्याविरुध्द शेतकऱ्यांना लुबाडण्याचे व जमीन हडप करण्याचे कटकारस्थान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आरोपांमध्ये तथ्य नाही..
मातोरी गावातील गायरानच्या २०४ एकर जमिनीच्या प्रकरणात आपल्यावर केल्या जाणाऱ्या आरोपात काही तथ्य नाही. या जमिनीसाठी आपण आधी व्यवहार केला आहे. या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तो व्यवहार आपल्याशी केला जात असल्याचे दर्शवून पंचांनी ही जागा त्रयस्थांना विक्री केली. या व्यवहारात गावातील अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधितांनी पोलिसात तक्रारही दिली आहे. या संपूर्ण घडामोडीत पोलीस यंत्रणेने सत्य हुडकून काढावे.
– अशोक कटारिया (उद्योजक)