अमरावती-नागपूर महामार्गावर कृषी महाविद्यालयासमोर भरधाव बोलेरो गाडीने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर अकोला मार्गावर लोणीनजीक झालेल्या दुसऱ्या अपघात सॅन्ट्रो कार आणि ट्रक यांच्या धडकेत कारमधील दोघांचा मृत्यू झाला.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षांला शिकत असलेल्या अनुराग राधेश्याम चोपकर (२२, रा भंडारा), शिशिर विलास सोनवणे (२३, रा. अकोला) यांचा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हे दोघेही एम.एच. ३० / आर ८२९९ क्रमांकाच्या बजाज पल्सर दुचाकीने पंचवटी चौकातून रहाटगावकडे जात होते. शिवाजी कृषी महाविद्यालयासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. २७ / ए.आर. ९३२२ क्रमांकाच्या बोलेरो गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बोलेरो वाहन ओमप्रकाश कुकरेजा नावाची व्यक्ती चालवित होती. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांच्या अपघाती मृत्युमूळे डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शोकमय वातावरण होते.
दुसरा अपघात अमरावती-अकोला मार्गावर लोणी बसथांब्याजवळ शुक्रवारी दुपारी घडला. या अपघातात सॅन्ट्रो कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ज्ञानेश्वर तायडे (४५, रा. यशोदानगर, अमरावती) आणि सुरेश कोकणे (५०, रा.अकोला) अशी मृतांची नावे आहेत. सुरेश कोकणे हे अकोला येथे बीएसएनएलमध्ये उपविभागीय अभियंता होते. आपल्या कुटुंबीयांसह ते एम.एच. ३० / ई २७७५ क्रमांकाच्या सॅन्ट्रो कारने अमरावतीकडे येत असताना लोणी बसथांब्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या जी.जे. १८ / ए.ओ. ७२७७ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने कोकणे यांच्या कारला धडक दिली. यात ज्ञानेश्वर तायडे आणि सुरेश कोकणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पौर्णिमा सुरेश कोकणे, लिलाबाई बापुराव कोकणे आणि शशिकला तायडे या तिघी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.