भारतातील अनेक शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित केले जात असून त्यात नागपूरचा समावेश आहे. शहरात महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी फ्रान्स सरकारकडून सहकार्य केले जाईल, असे मत फ्रान्सचे कौन्सिल जनरल जीन राफेल पेत्रग्ने यांनी व्यक्त केले.
फ्रान्सचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी नागपूर महापालिकेला भेट देऊन महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्याम वर्धने यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शहराची माहिती घेतली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीचोवीस बाय सात, भांडेवाडी प्रकल्प, ऊर्जा बचत, पेंच १,२,३,४, नद्यांचे शुद्धीकरण यासह शहरातील विविध प्रकल्पांवर पॉवर प्रेझेंटेशन केले. नागपुरात पाणी पुरवठय़ासाठी फ्रेंच कंपनी विव्होलिया काम करीत असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने यापूर्वीच जुळलो असलो तरी यापुढे जेएनएनयूआरएम अंतर्गत जे प्रकल्प सुरू आहेत त्यासाठी फ्रेंच कंपनीकडून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व उपयुक्त सुविधा फ्रान्सकडे आहे. पाणी पुरवठा व्यवस्था, सार्वजानिक वाहतूक, रस्त्यांचा विकास यासंबंधीचे कामे करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी फ्रान्सकडे असल्यामुळे साधारणात: दर दोन महिन्यांनी फ्रान्सचे विविध प्रकल्पाविषयीचे प्रतिनिधी मंडळ नागपुरात येऊन सहकार्य करतील, असेही पेत्रग्ने यांनी सांगितले. याशिवाय शिक्षण, संरक्षण, विकासात्मक प्रकल्प, आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त श्याम वर्धने, अभियंता प्रकाश उराडे यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाला विविध प्रकल्पाचे सादरीकरण केले. महापौर प्रवीण दटके आणि माजी महापौर अनिल सोले यांनी शहराची माहिती दिली. शहरात सुरू असलेले प्रकल्प आणि ऐतिहासिक स्थळांची ओळख करून दिली.
प्रवीण दटके म्हणाले, फ्रान्सच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांच्यासमोर केवळ विविध प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. चोवीस बाय सात पाणी पुरवठा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लवकरच एक शिष्टमंडळ नागपुरात येणार आहे. शिवाय पेंच  ४ आणि नागनदीसह शहरातील इतर नद्याचे शुद्धीकरणासोबत सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, उपायुक्त हेमंत पवार, नगरसेवक संदीप जोशी, बंडू राऊत, सुनील अग्रवाल आदी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. फ्रान्सच्या शिष्टमंडळाने दुपारी मिहानला भेट देऊन त्या ठिकाणी वेद आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.