लातूर शहरातील नामांकित महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला रिक्षामधून पळवून नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या प्रकरणी रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेण्यात आले, तर अन्य दोघे फरारी आहेत.
दरम्यान, गेल्या २० वर्षांत लातुरात कधीही असा प्रकार घडला नाही. शैक्षणिकदृष्टय़ा सुरक्षित म्हणून लातूरची ओळख आहे. गुरुवारी झालेल्या प्रकारामुळे शहराची ही ओळखही पुसून निघण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गुरुवारी दुपारी या विद्यार्थिनीला दुचाकीवर बसवून शहरातील शिवाजी चौक, रेणापूर नाका, रिंगरस्ता, नांदेडरस्ता मार्गे पळवून नेण्यात आले. लातूर तालुक्यातील शिकंदरपूर शिवारात तिच्यावर पाचजणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर विद्यार्थिनीला शहरातील राजीव गांधी चौकात आणून सोडले. तिच्याकडील पैसे, मोबाइल व दागिनेही काढून घेतले. या विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वत: जाऊन या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळास भेट देऊन या प्रकरणातील तिघांना ताब्यात घेतले. आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
प्रभाकर लक्ष्मण इरले (वय २९), प्रदीप निळकंठ इंगळे (वय ३०) व प्रवीण महादेव चाफेकर (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, अतिरिक्त अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरुपती काकडे आदींनी या प्रकरणी तपास करून आरोपींना अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू असून संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. लातूर शहर शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे. राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे शिक्षण घेण्यास गेल्या २० वर्षांपासून येतात. पहाटे पाच ते रात्री ११पर्यंत शिकवणीवर्ग सुरू असतात.