जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसात तीन गावे बाधीत झाली असून सुमारे २० घरांचे नुकसान तर १५ बक ऱ्या आणि एक म्हैस दगावली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दुसरीकडे यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात १ एप्रिलपासून मदत जमा केली जाईल असे आश्वासन खुद्द केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिले असले तरी महिन्याच्या अखेरी पर्यंत या संदर्भात निर्णय घेतला न गेल्यामुळे उपरोक्त तारखेला पैसे जमा होतील की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा अद्याप कायम असून रविवारी जिल्ह्यातील काही भागास पावसाने पुन्हा झोडपून काढले. मागील चोवीस तासात जिल्ह्यात ५.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने इगतपुरी तालुक्यातील १७ घरांचे अंशत: नुकसान झाले. तर मावडी येतील किसन घुले यांच्या घराचे दरवाडे तुटले कौल व भिंत तुटल्याने नुकसान झाले. मौजे वनोसे येथे गणेश जाधव यांच्या १४ बकऱ्या १ मेंढी वीज पडून ठार झाली. दिंडोरी तालुक्यातील मतळगेवा येथे १ म्हैस गतप्राण झाली. अवकाळी पावसाचे संकट कायम असले तरी फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या नुकसानीपोटी मदत एक तारखेला मिळणे अवघड झाल्याचे दिसत आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांचे पंचनामे करून अंतिम अहवाल शासनाकडे सादर झाले असले तरी अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी, उपरोक्त तारखेला नुकसाग्रस्तांना मदत मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटी नाशिक विभागाला अलीकडेच ७१ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली. त्यात नाशिक जिल्ह्याला ५५.१५ कोटी, धुळे ४.०८ कोटी, जळगाव ११.१० कोटी तर नगर जिल्ह्याला ८७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट केली. एका क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी निफाड तालुक्यात भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एप्रिलच्या सुरुवातीपासून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर केले होते. तथापि, एप्रिलच्या दोन दिवस आधीपर्यंत कोणत्या पिकासाठी किती मदत याबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येते. गतवेळी जिरायतसाठी दहा हजार रुपये हेक्टरी, बागायती क्षेत्रासाठी १५ हजार तर फळ पिकासाठी २५ हजार रुपये हेक्टर अशी मदत जाहीर झाली होती. यंदा या संदर्भातील निर्णय अद्याप झाला नसल्याने जाहीर झालेल्या तारखेला मदत शेतकऱ्यांच्या खिशात पडेल याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.