प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात, ग्रामीण भागातील परिचारिकांची रिक्त पदांवर बदली करावी, आदी मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी सोमवारी सकाळी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील परिचारिका मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या. वरिष्ठ पातळीवर मागण्यांबाबत चर्चा सुरू असल्याने दुपारनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी शिकाऊ परिचारिकांसह काही अन्य परिचारिकांची काही वेळासाठी मदत घेण्यात आली.
नाशिक जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये साधारणत: एक हजारहून अधिक परिचारिका रुग्णसेवेचे काम करतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात परिचारिकांना कामकाज करताना राजकीय दबावासह अन्य काही अडचणींना तोंड द्यावे लागते. याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कामात चालढकल होते. परिणामी, अशा काही परिचारिकांवर कारणे दाखवा किंवा निलंबनाची कारवाई केली जाते. यामुळे या महिला कर्मचारी जिल्हा रुग्णालय किंवा शहरातील इतर रुग्णालयांमध्ये बदली मागतात. दुसरीकडे, शहरात परिचारिकांची दैनंदिन कामकाजाची घडी पूर्णत: बसलेली आहे. ग्रामीण भागातील परिचारिका येणार म्हणजे शहरातील एका परिचारिकेला दुसरीकडे जावे लागणार. कोणावर तरी या बदलीमुळे अन्याय होणार. सहा किंवा तीन वर्षे त्या जागेवर काम करण्यात यावे हा राज्य सरकारचा नियम आहे. काही आजार असल्यास अथवा मुले १० वी किंवा १२ वीला असल्यास, कौटुंबिक अडचणी असल्यास बदलीचे नियम शिथिल केले जातात. या पाश्र्वभूमीवर, परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात, ग्रामीण भागातील परिचारिकांची रिक्त पदांवर बदली करावी, या मागणीसाठी सोमवारी परिचारिका संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात आला. संपात शहरातील ३०० परिचारिका सहभागी झाल्या. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी निदर्शने केली.
सोमवारी दुपारी राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा आठवले व आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चर्चा झाली. मागण्यांबाबत राज्य शासन तसेच आरोग्य संचालकांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनास स्थगिती देण्यात आली.
त्यामुळे दुपारनंतर परिचारिका आपल्या कामाच्या ठिकाणी
रुजू झाल्या. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा रुग्णालयात परिचारिकेचे शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीसह काही करारावर असलेल्या परिचारिकांची मदत घेण्यात आली.

प्रशासकीय बदल्या रद्द करा
प्रशासकीय बदल्या वा अन्य बदल्या होऊच नये ही संघटनेची मागणी आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात अनुभवी परिचारिकांची नितांत गरज आहे. अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून ग्रामीण भागातील परिचारिका बोलावता येतील. मात्र शहरी असो वा ग्रामीण भागातील परिचारिका कोणावरही अन्याय न होता मध्यमार्ग काढणे गरजेचे आहे.
 लता बोडके
 (अध्यक्षा, नाशिक जिल्हा परिचारिका संघटना)