सामान्य व्यक्तीने कुठलाही गुन्हा केला की त्याच्यावर तात्काळ कारवाई करून शिक्षा केली जाते. मात्र, राजकीय नेत्यांच्या मुलांनी कसेही वागले आणि गुन्हे दाखल असले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही किंवा त्यांना शिक्षाही होत नाही. संबंधित राजकीय पक्षाचे त्यांना समर्थन असल्यामुळे कसेही वागले आणि काही केले तरी त्यांना सर्व गोष्टी माफ असतात. सत्तेत नसलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या मुलाने आमचे कोणीच बिघडू शकत नाही, अशी मानसिकता ठेवत बंदुकीचा धाक दाखवत चक्क दादगिरी सुरू केली आहे. यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांच्या बाबतीत असे प्रकार घडले आहेत. मात्र, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्यामुळे ते बिनधास्तपणे समाजात वावरत असतात.
भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला तरी राजकारणात घराणेशाही संपलेली नसल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची मुले गेल्या काही वषार्ंत राजकारणात उतरली आहेत. त्यातील काही नेत्यांच्या मुलांना यश आले असून ते समाजात चांगली कामे करीत आहेत तर काही नेत्यांची मुले मात्र खुलेआम बंदुकीचा धाक दाखवत सामान्यांना त्रस्त करीत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत याने शनिवारी मध्यरात्री सदरमधील पुनम चेम्बरसमोर एका सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला. पोलिसांनी या घटनेसंदर्भात दुसऱ्या दिवशी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर तो नागपुरात असला तरी पोलिसांना गवसला नाही. दरम्यान, त्याने न्यायालयातून तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला आणि स्वतच सदर पोलीस ठाण्यात हजर झाला. दुष्यंत याच्या बाबतीत यापूर्वी अनेकदा सामान्य नागरिकांना धमकावण्याचे आणि मारामारी केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. मात्र, त्यावेळी वडील सत्तेत असल्यामुळे कारवाई केली जात नव्हती. आता सत्तेत नसतानाही त्याची दादागिरी सुरू आहे. खुलेआम बंदूक घेऊन शहरात धमकावले जात असताना त्याच्यावर कारवाई केली जात नाही.
काँग्रेसचे दुसरे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र व राज्य युवक काँग्रेसचे पदाधिकारी कुणाल राऊत याच्याविरुद्ध मध्य प्रदेशातील पिपरिया पोलीस ठाण्यात वन अधिकारी आणि मजुरांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी वडील मंत्री होते, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. कुणालवर यापूर्वी धमकावण्याचे गुन्हे दाखल असून त्यासंदर्भात कारवाई मात्र केवळ कागदावर आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या सुरक्षा रक्षकाने रेल्वे स्थानकावर एका ऑटोचालकाला बंदुकीचा धाक दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला.
मात्र, त्या संदर्भात कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांची मुले आमचे कोणी बिघडू शकत नाही, अशी मानसिकता ठेवून सामान्य नागरिकांना धमकावत आहेत, मात्र पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करीत नाही.