पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. चालू वर्षांतही पोलिसांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या पंचवीस दिवसांत पोलिसांवर हल्ल्याच्या एकूण ४ घटना घडल्या आहेत. पोलिसांवरही हल्ले रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी सुरू केलेली योजनाही फसली आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्यही खचत चालले आहे.
१३ जानेवारी २०१५
मुलुंडच्या बी. आर. चौकीसमोर असलेल्या दोन इसम लघुशंका करत होते. त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या विजय यादव आणि डेरे या दोन हवालदारांनी त्या दोघांना हटकले. त्यामुळे चिडलेल्या या दोघांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हे दोन्ही पोलीस कर्मचारी गणवेशात होते हे विशेष.
१५ जानेवारी २०१५
सांताक्रुझ पश्चिमेच्या एका रस्त्यावर एका ५२ वर्षीय प्राध्यापिकेने भर रस्त्यात आपली गाडी पार्क केली होती. बेस्ट बसला त्यामुळे पुढे जाता येत नव्हते. पर्यायाने वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच एक वाहतूक पोलीस तेथे आला आणि वाहनचालकाचा शोध सुरू केला. काही वेळाने शेजारच्या मॉलमध्ये खरेदीला गेलेली ही प्राध्यापक महिला परतली. हवालदाराने तिला जाब विचारताच ती भडकली आणि तिने थेट या हवालदाराच्या श्रीमुखात लगावून दिली. मग पोलीस ठाण्याला फोन करून महिला पोलीस कर्मचारी बोलावून या प्राध्यापक महिलेला अटक करण्यात आली.
२० जानेवारी २०१५
कुर्ला पूर्व येथे दोन वाहनांचा अपघात झाला होता. नेहरू नगर पोलिसांनी दोनी वाहनांच्या चालकांना पोलीस ठाण्यात आणले होते. त्यापैकी एका चालकाच्या वाहनाचा विमा नव्हता. या अपघातात त्याची चूक निदर्शनास आल्याने पोलीस त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार होते. त्यावेळी त्याने वडाळा येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यावेळी या चालकाच्या एका नातेवाईक महिलेने पोलीस ठाण्यातच गणवेषात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या श्रीमुखात भडकावली होती.
२७ जानेवारी २०१५
बोरीवलीतील सुमन नगर येथे राजेंद्र नगर पुलाजवळ नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी अश्विनकुमार सिंग आणि अभिषेक पांडे हे दोन तरुण मद्यपान केलेल्या अवस्थेत मोटारसायकलीवरून येत होते. त्यांनी हेल्मेटही घातले नव्हते. पोलिसांनी त्यांना अडवून कागदपत्रांची तपासणी सुरू केल्यानंतर एकाने पोलीस हवालदार चौगुले याच्या श्रीमुखात भडकावली. इतर पोलीस मदतीला गेले. त्यावेळी दुसऱ्या तरुणाने दीपक गिते या पोलीस हवालदाराच्या हाताच्या बोटाला कडकडून चावा घेतला. हा चावा एवढी जोरदार होता की बोटाचा तुकडाच खाली पडला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत तुटलेले बोट सापडले नव्हते. जेव्हा बोट सापडले तेव्हा उशीर झाला होता. त्या बोटाचे रोपण पुन्हा शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे दोन्ही तरुण एमबीएचे विद्यार्थी होते.
या सर्व घटनेत पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक करून सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ले करणे (भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३) प्रमाणे अटक करण्यात आली. पोलिसांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
सत्यपाल सिंह पोलीस आयुक्त असताना पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी एक परिपत्रक काढले होते. ज्याने पोलिसांवर हल्ला केला त्याची एक ब्लॅक लिस्टची फाइल बनवायची. पारपत्र कार्यालय, सेवा नियोजन कार्यालय, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच तो ज्या कार्यालयात काम करत असेल त्या ठिकाणी पत्र पाठवून याबाबत माहिती पुरविली जाईल, अशी तरदूत करण्यात आली होती. अशा हल्लेखोरांची सर्वत्र कोंडी करण्याची ही योजना होती. सुरुवातीला अशी पत्रे पाठवली जात होती. परंतु आता ही योजना बारगळली आहे. अशी पत्रे पाठवूनही काही उपयोग होत नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. लोकांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. हल्ले होणे ही काही नवी गोष्ट नाही. यापूर्वी पण ते होत होते. या गुन्ह्य़ासाठी फाशी जरी दिली तरी हे प्रकार थांबणार नाहीत, अशी उद्विग्नता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.

आम्ही पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची नावे पत्राद्वारे पारपत्र कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालयांना कळवत असतो. परंतु फार काही निष्पन्न होत नसल्याचे दिसून येत नाही. त्याचे पारपत्र रद्द होत नाही. कारण गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी तो सिद्ध होणे गरजेचे असते.
 -डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५.

पोलिसांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे. लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. त्यासाठी यापुढे कठोर पावले उचलावी लागणार आहेत.
  -डॉ.धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त, प्रवक्ते- मुंबई पोलीस