मुंबई विद्यापीठापेक्षाही जुन्या आणि तब्बल १८८ वर्षांची परंपरा असलेल्या फोर्ट येथील एलफिन्स्टन या सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची महाविद्यालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या उदासीन वागणुकीमुळे परवड सुरू असल्याची तक्रार आहे.
अंध किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठल्याही शैक्षणिक संस्थेने संवेदनशीलपणे हाताळणे आवश्यक आहे. परंतु जागोजागी नियमांवर बोट ठेवण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांची पदोपदी अडवणूक होत असल्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची तक्रार आहे.
या महाविद्यालयाला काही वर्षांपूर्वी ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’कडून अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वापराकरिता म्हणून सुमारे आठ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे साहित्य मिळाले होते. ब्रेल प्रिंटर, अंधांना इंटरनेटचा वापर करता यावा यासाठीचे खास सॉफ्टवेअर असलेले संगणक, व्हॉईस रेकॉर्डर इत्यादी साहित्याचा वापर केवळ महाविद्यालय मदतनीस देत नाही म्हणून अंध विद्यार्थ्यांना करू दिला जात नाही. त्यामुळे गेले कित्येक महिने ते धूळ खात पडून असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
या महाविद्यालयात शिकणारे काही अंध विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. काहींचे पालक तर अक्षरश: शेतमजूर आहेत. अशा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी ट्रस्टकडून आर्थिक स्वरूपाची मदत मिळते. या ट्रस्टकडून मदतीकरिता म्हणून भरावयाच्या अर्जावर महाविद्यालयाकडून सही आणि शिक्का घ्यावा लागतो. परंतु साधा सही-शिक्का देण्याकरिताही महाविद्यालय प्रशासन नकार देत असल्याने हे विद्यार्थी या मदतीपासून वंचित आहेत. कित्येकदा ट्रस्ट विद्यार्थ्यांऐवजी महाविद्यालयाच्या नावे धनादेश पाठवितात. परंतु काही विद्यार्थ्यांचे तर ट्रस्टकडून महाविद्यालयाच्या नावे आलेले मदतीचे धनादेश स्वीकारण्यासही प्रशासनाने नकार दिला होता. त्यामुळे हे धनादेश विद्यार्थ्यांना नाइलाजाने ट्रस्टला परत करावे लागले होते. इतक्या साध्या साध्या बाबींकरिता महाविद्यालयाकडून अंध विद्यार्थ्यांची अडवणूक कशी काय केली जाते, असा प्रश्न महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी केली. अंध विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ असूनही त्यांच्याकडून ते वसूल केले जाते. लेखनिक देण्याच्या बाबतीतही महाविद्यालय सहकार्य करीत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
आरोप बिनबुडाचे
या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्य माधुरी कागलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेले सर्व आरोप धुडकावून लावले. अंध विद्यार्थ्यांच्या वापराकरिता महाविद्यालयाकडे साहित्य आहे. तसेच त्याचा वापरही विद्यार्थी करीत आहे, असा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांना मिळालेले मदतीचे धनादेश परत पाठविण्याबाबत त्या म्हणाल्या की, हे सरकारी महाविद्यालय असल्याने महाविद्यालयाच्या खात्याद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीचे धनादेश वठविण्यात अडचणी आहेत. सर्व पैशाचा हिशोब वर्षांच्या शेवटी सरकारला द्यावा लागतो. त्यामुळे या खात्याद्वारे विद्यार्थ्यांचे धनादेश वठविता येत नाहीत, अशी तांत्रिक अडचण त्यांनी सांगितली. उलट विद्यार्थी मदतीसाठी पात्र ठरावे याकरिता आम्ही त्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र देतो, असा दावा त्यांनी केला.