नवी मुंबई पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. शिवसेनेने होम मिनिस्टर आदेश बांदेकर यांना निवडणुकीला दीड महिना शिल्लक असताना प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे. त्यांच्या ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाने प्रचारात आघाडी घेतली असून तीन तास चालणाऱ्या या मौज, मस्ती, मनोरंजन कार्यक्रमाचे आतापर्यंत तीन भव्य प्रयोग झाले आहेत. त्यांना महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवून इतर पक्ष पालिकेच्या या निवडणुकीसाठी कलावंतांचा खुबीने उपयोग करून घेणार असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई पालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. मागील आठवडय़ात झालेल्या प्रभाग रचना आणि आरक्षणानंतर सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील एका श्रीमंत पालिकेवर आपल्या पक्षाचा सत्तासोपान चढविण्यासाठी नेते सरसावले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत होम मिनिस्टर आदेश भावोजी यांच्या ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमाचे काही प्रयोग नवी मुंबईत झाले होते. त्याचा फायदा शिवसेनेला झाल्याचा दावा शिवसेना नेत्यांचा आहे. तोच प्रयोग पालिका निवडणुकीत केला जाणार आहे.
बेलापूर व नेरुळ पूर्व भागांत झालेल्या दोन यशस्वी प्रयोगांनंतर रविवारी नेरुळ पश्चिम भागात हा प्रयोग काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हातात शिवबंधन बांधणारे सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी आयोजित केला होता. त्याला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याने रामलीला मैदान महिलांनी फुलून गेले होते. यात एका अंध, अपंग मुलीने गायलेले पसायदान अनेकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले. बांदेकर या कार्यक्रमात वारंवार खुलेआम शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन महिलांना करत होते. त्यावर मी एक कलांवत असलो तरी शिवसैनिक आहे. त्यामुळे ताकाला जाताना भांडे काय लपवायचे, अशी प्रतिक्रिया बांदेकर यांनी व्यक्त केली. सात वर्षांच्या चिमुकलीपासून ते सत्तर वर्षांच्या महिलांनी या कार्यक्रमात घेतलेल्या सहभागामुळे शिवसेनेला प्रचाराचा हुरूप आला असून त्यानिमित्ताने शिवसेनेने कळत नकळत इतर सर्व पक्षांपेक्षा प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. बेलापूर, नेरुळनंतर जुईनगर, सानपाडा, ऐरोली या भागांत या कार्यक्रमाचे प्रयोग होणार आहेत.
समाजकारणाच्या या मार्गावर कधीही राजकारण करणार नाही आणि व्यवसायाच्या आड राजकारण करणार नाही हे माझे ब्रीदवाक्य आहे.  या प्रयोगासाठी मानधन घेतले जाते; पण ते सहकारी कलाकार आणि समाजकारणासाठी वापरले जात आहे. इतर कोणताही व्यावसायिक राजकारणात आला तर त्याची चर्चा होत नाही; पण कलाकार राजकारणात आला तर मात्र त्याची चवीने चर्चा केली जात आहे. का तो माणूस नाही? त्याला मन नाही? तो भारतीय नाही? हिंदी तसेच दाक्षिणात्य सृष्टीतील अनेक कलावंतांनी विविध पक्षांचा झेंडा हाती घेतला आहे. आम्हीही काही मराठी कलावंतांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सुसंस्कृत, संयमी नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या कार्यक्रमाची आता एक थेरपी तयार झाली असून असाध्य आजारांनी अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांनापण जगण्याची ऊर्मी लाभत आहे, हेच या कार्यक्रमाचे यश असून यानिमित्ताने मला सर्वत्र आनंद वाटता येत आहे.
    -आदेश बांदेकर,  शिवसेना सचिव तथा निर्माता, ‘खेळ मांडियेला’