कोकणचो नाव आन् गोयंचो गाव..

पेट्रोल -डिझेलचे दर वाढल्यापासून रिक्षा-टेम्पोचे भाडेही वाढले आणि मुंबईहून रेल्वेने पन्नास रुपयात कोकणात जाणाऱ्या

हर्षद कशाळकर, अलिबाग | February 26, 2013 1:13 AM

पेट्रोल -डिझेलचे दर वाढल्यापासून रिक्षा-टेम्पोचे भाडेही वाढले आणि मुंबईहून रेल्वेने पन्नास रुपयात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला स्टेशनपासून घरापर्यंत पोहचण्यासाठी मात्र रिक्षा-टेम्पोला दोनशे रुपये मोजणे भाग पडू लागले. रेल्वेचा स्वस्तात पडणारा हा प्रवास अशा रीतीने महागडा ठरू लागल्याने निदान गावाजवळच्या प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबवावी, अशी मागणी मुंबईतील कोकणवासी करीत आहेत. रेल्वे स्थानकापासून कितीतरी आत असलेल्या गावी रात्री-बेरात्री जाण्यासाठी रिक्षाला पर्याय नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून गावाजवळच्या स्थानकांवर थांबा दिल्यास घर जवळ येईल, अशी चाकरमान्यांची मागणी आहे.  
कोकणातील रेल्वे स्थानके संबंधित गावे/शहरापासून लांब आहेत. प्रत्येक स्थानकापासून किमान १० ते १२ किमी अंतरावर ही गावे असल्याने गावापर्यंत जाण्यासाठी एसटी किंवा रिक्षाशिवाय पर्याय नसतो. काही महिन्यांपासून डिझेलचे आणि पेट्रोलचे भाव वाढू लागल्यापासून रिक्षा आणि अन्य गाडय़ांचा प्रवास महाग झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गाडय़ांच्या वेळा या योग्य नसल्याने प्रवाशांचा रेल्वे स्थानकापासून घरी जाण्यापर्यंतचा प्रवास जास्त खर्चिक आणि त्रासदायक असतो.
त्याचप्रमाणे काही गाडय़ा केवळ मोजक्याच स्थानकांवर थांबतात. अन्य स्थानकांवर त्यांना अधिकृत थांबा नाही. त्यामुळे या गाडय़ा त्या स्थानकावर थांबल्या की सामानासह मार्गामध्ये किंवा फलाटावर उडय़ा मारणे आणि बाहेर पडणे असे दिव्य प्रकार प्रवाशांना करावे लागतात. कोकण रेल्वे हे केवळ नाव असून बहुतेक गाडय़ा या गोवा आणि केरळ पर्यंत जात असल्याने ‘कोकणचे नाव आणि गोव्याचे गाव’ अशी परिस्थिती आहे. खास कोकणासाठी केवळ तीन ते चार गाडय़ा असून त्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे. खास कोकणासाठी, सर्व स्थानकांवर थांबणारी अशी गाडी सुरू करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. कोकण रेल्वेच्या स्थानकांची उंची वाढविण्यात यावी, अशीही प्रवाशांनी मागणी केली आहे.
मात्र कोकण रेल्वेची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता शहरांजवळ आणि जास्त स्थानके उभारणे शक्य नसल्याचे कोकण रेल्वेच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.
कोकणातील अनेक स्थानकांना प्लॅटफॉर्म नाही. ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, त्या ठिकाणी  संरक्षक निवारा शेड नाही. कोकण रेल्वे ही देशातील एकमेव रेल्वे आहे ज्यांची स्वत:ची पोलीस यंत्रणाही नाही.  कोकण रेल्वे मार्गावर तळकोकणात टर्मिनेट होणाऱ्या किमान दोन जलद गाडय़ा असाव्या अशी माफक अपेक्षा कोकणवासीयांची आहे. याशिवाय शिमगोत्सव, गणेशोत्सव आणि दिवाळीत सुट्टीकालीन विशेष गाडय़ा सोडल्या जाव्यात, अशी मागणी केली जाते आहे. त्याचबरोबर दक्षिणेत जाणाऱ्या गाडय़ांना कोकणात जादा थांबे असावेत आणि या गाडय़ांमध्ये तळकोकणात जाण्यासाठी आरक्षण कोटा असावा अशी माफक अपेक्षा आहे. त्यामुळे कोकणवासीयांना रेल्वे अर्थसंकल्पातून मोठय़ा अपेक्षा राहणार आहेत आणि कोकणवासीयांच्या अपेक्षांची रेल्वे आता तरी धावणार का, हे या रेल्वे अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे.
रायगडच्या अपेक्षा
* अलिबाग-पेण नव्या रेल्वेमार्गाच्या घोषणेची अपेक्षा
*  कर्जत-पनवेल लोकल सेवा अथवा शटल सेवेची अपेक्षा
*   पनवेल-रोहा मार्गावर शटल सेवा
* माणगाव-दिघी मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद

First Published on February 26, 2013 1:13 am

Web Title: kokan name and actually village of goa