कुर्ला-कलिना परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे १७ हजार सदनिका या विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांना दिल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. कुर्ला परिसरात उभारण्यात आलेल्या १७ हजार सदनिका तयार असल्या तरी यातील काही सदनिका या मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात सोपविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या साऱ्या सदनिका झोपडपट्टी परिसरातील झोपडपट्टीवासीयांना मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक आमदार नसिम खान यांनी केली. यावरून वाद सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात या साऱ्या सदनिका विमानतळ परिसरातील विस्थापित होणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना देण्यात याव्यात, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या परिसरातील सर्व ७० हजार झोपडपट्टीवासीयांचे त्याच परिसरात पुनर्वसन व्हावे, अशी मागणी नसिम खान यांनी केली आहे.