सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील कोटय़वधी किमतीचे गहू, तांदूळ आणि साखरेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार जिल्हा पुरवठा विभागाने उघडकीस आणला आहे. सुरगाणा तालुक्यात घडलेल्या या घटनेत पुरवठा व्यवस्थेतील गोदामपाल, पुरवठा निरीक्षक आणि वाहतूक ठेकेदाराचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनुदानित मालाची खुल्या बाजारातील किंमत पाच कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी तीन शासकीय कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा पुरवठा विभागाने मालाचा अपहार करणाऱ्या वाहतूक ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याला कसे पाय फुटतात, याबद्दल नेहमी चर्चा सुरू असते. गोरगरिबांना सवलतीच्या दरात शासन दर महिन्याला अन्न-धान्य पुरवते. त्यासाठी प्रत्येक तालुक्याचा विशिष्ट कोटा ठरलेला आहे. त्यानुसार वितरित होणारे हे धान्य लाभार्थीपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड होत असते. सुरगाणा येथे उघडकीस आलेला प्रकार त्यापैकीच एक म्हणता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यात याच व्यवस्थेतील घटक सहभागी असल्याचे उघड झाले आहे. ३० सप्टेंबर २०१४ ते १९ डिसेंबर २०१४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे सुरगाणा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सुरगाणा शासकीय गोदामातील २१ हजार ५५१ क्विंटल गहू, ९०५१ क्विंटल तांदूळ आणि ७३ क्विंटल साखर असा माल वाहतुकीदरम्यान गायब करण्यात आला. याप्रकरणी सुरगाण्याचे गोदामपाल रमेश दौलत भोये, नाशिक येथील मेसर्स एस. एम. मंत्रीचे भागीदार मोरारजी मंत्री, सुषमा मंत्री, संजय गडाख, श्रीराम नारायणदास मंत्री, अंबड गोदामाचे वाहतूक प्रतिनिधी वाय. एम. मंडलिक आणि सुरगाण्याचे पुरवठा निरीक्षक एस. जी. धूम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सार्वजनिक वितरणासाठी उपरोक्त काळात हा माल आला होता. या मालाची शासकीय अनुदानित किंमत गहू ३२ लाख ३३ हजार, तांदूळ १८ लाख १० हजार, तर साखर दोन लाख १९ हजार रुपये आहे. संशयितांनी संगनमताने या मालाची खुल्या बाजारात विक्री केली. बाजारभावाने त्याची किंमत ९५ लाख ७६ हजार ४६४ इतकी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यातील मालाचा अपहार करून तो साथीदारांच्या मदतीने परस्पर विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी पोलिसात तक्रार दिली. खुल्या बाजारात या मालाची किंमत पाच कोटी रुपये असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. इतक्या मोठय़ा प्रमाणात रेशनिंगचा माल गायब होण्याचा प्रकार उघडकीस येण्याची ही पहिलीच घटना आहे. नाशिकरोड व अंबड गोदामातून मालाची वाहतूक करणारा कंत्राटदार यात सामील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा माल गायब केला. या संदर्भात संबंधिताला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वाहतुकीचे कंत्राट का रद्द करू नये, असे त्या नोटिसीत म्हटल्याचे जवंजाळ यांनी सांगितले.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
Proposed to lease out ST land for 60 to 90 years instead of 30
एसटीची जागा भाडेतत्त्वावर देणार, ३० ऐवजी ६० ते ९० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव
Limited sources of water supply to cities in Thane district
ठाणे जिल्ह्यतील शहरांपुढे भविष्यातील ‘जलचिंता’