वाचकांचा ग्रंथालयाशी ऋणानुबंध निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी ग्रंथपालांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे. वाचक आणि ग्रंथपालांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे. वाचकांना हवे असणारे साहित्य शोधून देणे हे जरी ग्रंथपालाचे काम असले तरी वाचकाला आवडू शकतील अशी नवनवीन साहित्यकृती वाचकासमोर ठेवण्याचा प्रयत्न ग्रंथपालाने करणे गरजेचे आहे. ग्रंथपाल हा वाचक आणि साहित्यातला दुवा बनला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांनी व्यक्त केले.
ठाणे नगर वाचन मंदिराच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी साहित्यकृती  वाचकांपर्यंत पोहचवण्यात ग्रंथपाल महत्त्वाचे आहेत, असे सांगितले. वाचन संस्कृती लयाला गेली आहे, अशी ओरड गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मात्र आजपर्यंत असे काहीच घडलेले नाही. उलट मराठी भाषा चांगली असून ती वेगाने वाढत आहे. नवनवे शब्द या भाषेत समाविष्ठ होत आहेत. वाचनासारखे दुसरे सुख नाही म्हणून पुस्तकाला मित्रासारखी वागणूक देण्याची गरज आहे. ग्रंथालय हे ज्ञानमंदिर आणि मनोरंजन मंदिरसुद्धा आहे. ज्यामध्ये सर्व साहित्याचा साठा आहे. सुशिक्षितांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंटे यांनी केले.