शताब्दी सोहळ्यानिमित्त ठरविलेले ‘टार्गेट’ यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळेच की काय, आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग यांना ‘मविप्र मॅरेथॉन’ स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची कल्पना भन्नाटच म्हणावयास हवी. अशा कल्पना याआधीच राबविल्या असत्या तर आज संपूर्ण राज्यात आणि कदाचीत राष्ट्रीय पातळीवरही क्रीडा क्षेत्रात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा दबदबा वाढला असता. उशिरा का होईना, अशा कल्पनांची दखल घेऊन त्या वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देणे हेही नसे थोडके.
मविप्र मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त संस्था क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात काही अडथळे येत असल्याने ही एक ‘अडथळ्यांची शर्यत’च झाली आहे. असे असतानाही अडथळ्यांमधून वाट काढत संस्थेकडून गुणवंत खेळाडूंसाठी काही चांगले निर्णय घेण्यात आले. संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांनी आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग यांच्या मार्गदर्शनाखाली शुटिंग रेंज प्रबोधिनी सुरू करण्याच्या निर्णयाचे अनेक स्तूत्य परिणाम भविष्यात दिसतील. राष्ट्रीय पातळीवर विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा शैक्षणिक खर्च, वसतीगृहाचा खर्च पेलण्याची तयारी संस्थेने घेतली आहे. या निर्णयामुळे दहावी किंवा बारावीनंतर संस्था सोडून दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या खेळाडूंना आता वेगळा विचार करावा लागेल. संस्थेचा एकंदर पसारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधिक असल्याने आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना शरीरसंपदेच्या बाबतीत काही देण मिळालेली असल्याने त्यांना ही प्रबोधिनी एका अनोख्या कारकिर्दीचे वळण ठरू शकेल. स्पर्धेतील विविध वयोगटांच्या निकालावर नजर टाकल्यास गिरणारे आणि मखमलाबाद परिसराचे वर्चस्व सहज लक्षात येईल. या परिसरातून पुढे येणाऱ्या धावपटूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेने पेलावयास हवी. म्हणजे दुसऱ्यांना संस्थेतील खेळाडू पळविण्याची संधीच मिळणार नाही. संस्था पुढील वर्षांपासून सर्वासाठी इतर वयोगटात भाग घेण्याची संधी प्राप्त करून देणार असल्याने खऱ्या अर्थाने स्पर्धा अधित तीव्र होणार आहे. एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या काही तज्ज्ञांना संस्था आमंत्रित करणार असली तरी संस्थेतील क्रीडा शिक्षकांना योग्य मार्गदर्शनाची व्यवस्था संस्थेने केल्यास घरातच तज्ज्ञ तयार होऊ शकतील. परंतु त्यादृष्टिने संस्थेने आपल्या क्रीडा शिक्षकांना अधिकारही देणे आवश्यक आहे.
मॅरेथॉन स्पर्धेच्या तांत्रिक बाजूसह इतर बहुतांश भार उचलणाऱ्या संस्थेच्या क्रीडा संचालकांची स्पर्धापूर्व पत्रकार परिषदेत केवळ आभार मानण्यापुरती उपस्थिती त्यादृष्टिनेच खटकण्यासारखी. संस्था पदाधिकाऱ्यांनी अशावेळी त्यांच्यावर जबाबदारी टाकली असती तर ‘रामदेवबाबा महात्म्य’ऐवजी मॅरेथॉनविषयक अधिक माहिती मिळू शकली असती. या स्पर्धेत अजूनही देशातील नामवंत धावपटू सहभाग घेत नाहीत, हे वास्तव आहे. स्पर्धेतील विजेत्यासाठी ठेवण्यात आलेली कमी रक्कम (रूपये एक लाख) हे त्यामागील एक कारण होय. बहुतेक स्पर्धक स्पर्धेचा दर्जा त्यानुसारच ठरवित असतात, हे कटू असले तरी सत्य आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी संस्था असा नावलौकीक असलेली मविप्र त्यादृष्टिने मॅरेथॉनचा दर्जा उंचाविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकेल. संस्थेने सर्वोत्कृष्ठ खेळाडू पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवरील वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त खो-खो पटू स्वप्निल चिकणेची निवड करून सर्वानाच योग्य संदेश दिला आहे. स्वप्निलने सध्या संस्था बदलली असली तरी मविप्रने त्याचा गौरव करणे त्यामुळेच कौतुकास्पद होय.