तिन्ही बाजूंना छोटय़ा छोटय़ा डोंगरांच्या रांगा, सलग. घनगर्द वनराई, हिरवाईचं माहेर. टेकडय़ांच्यामध्ये ओतून दिलेलं पाणी, सगळ्या जंगलातून येऊन एका ठिकाणी जमा होणारं. समोरच्या डोंगरावर एक सुंदर मंदिर. मंदिरापर्यंत चढत गेलेल्या पायऱ्या. तलावाच्या पाण्यात कधी स्वत:चं, तर कधी अस्मानाचं प्रतिबिंब न्याहळत बसलेलं मंदिर. मागच्या डोंगरावर एक पूर्णत: उद्ध्वस्त झालेला गड. तटबंदीचे केवळ दोनचारच दगड उरलेले. संपूर्ण झिजून गेलेला प्रवेशमार्ग, पण गडावर एक आदिम खुणांचा दगड. या परिसरातला सर्वात आदिम साक्षीदार. बाजूच्या डोंगरात खोदलेल्या लेण्या. या लेण्या मोठय़ा विलक्षण. सारी हिरवाई नजरेच्या कवेत घेणाऱ्या. सायंकाळच्या सुमाराला तलावाच्या पाण्यावर उतरणारे मोर. जंगलात पसरलेल्या शांततेवर तरंग उमटवणाऱ्या मोरांच्या केका. असं स्थान कवडशी. तिथल्या जंगलासोबतच तिथले प्राचीन अवशेषही महत्त्वाचे. खूप वर्षांपासून या ठिकाणानं मनावर गारूड केलंय. प्रत्येकच वेळी हे जंगल आणि या अवशेषांनी नवीनतेचा अनुभव दिला. एखाद्या सुरेल चित्रासारख्या असणाऱ्या या स्थानानं मनात कायम घर केलंय.
गेलं वर्षभर मध्ये मध्ये खंड पडत चालू असलेला ‘वारसा’ या सदराचा प्रवास आज थांबत आहे. हा या वर्षीचा शेवटला लेख लिहिताना ज्यांनी मला माझी ओळख दिली त्या या सर्व जागा आठवत आहेत. खूप आधीपासून प्राचीन मंदिरं गड-किल्ले मूर्ती याचं विलक्षण वेड. मन त्यातच रमतं. मग अवशेष असले तरी मला ते आपले वाटतात. तिथली सार्वभौम शांतता माझ्याशी बोलते, असा मला भास होतो. लिहिणं हे एक निमित्त होतं. काही अंशी पुन:प्रत्यय होता, पण त्याहीपेक्षा मला ते जगणं जगायला आवडतं, तेच जगणं आहे, असं वाटतं.
बऱ्याच प्राचीन अवशेषांनी ठाव धरलाय जंगलाच्या मनात. या अवशेषांसोबतच या जंगलातही मला घरपण दिलं. विदर्भात असे अवशेष सर्वदूर आढळतात. अनेक गड-किल्ले यांची माहितीच नाही. नक्षीवंत श्रीमंत मंदिरं जगतायत उपेक्षेचं जीणं. वर्तमानाचा प्रकाश पोहोचतच नाही तिथवर.. अशा या स्थळांवर लिहिण्याची संधी लोकसत्तानं दिली. ही स्थळं या निमित्तानं पुन्हा अनुभवता व अभ्यासता आली. उघडय़ावर वर्षांनुवर्षे ऊन्ह, वारा, पावसाचा मारा झेलत पडून असलेले हे अवशेष पाहून मन खंतावते. दर दुसऱ्या रविवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. त्यातून या अवशेषाबद्दल लिहिता आलं नाही. या सदरातही मला सातत्य राखता आलं नाही, याचं वाईट वाटतं. या सदराच्या निमित्तानं लेख वाचून अनेकांचे फोन आले. अनेकांनी कौतुक केलं. हे कौतुक हा माझा ठेवा आहे, पण त्याचबरोबरच जर लिखाणात तोच तो पणा येत असेल, नेमके संदर्भ नसतील तर जे नियमित वाचायचे त्यांनी कानउघाडणी केली आणि योग्य मार्गदर्शनही केलं. या सर्वाचं प्रेम सदैव प्रेरणा देत राहील. गेलं संपूर्ण वर्ष हे एक प्रकारच्या अस्वस्थतेत गेलं. ही अस्वस्थता सर्वच प्रकारे परिणाम करणारी ठरली, लिखाणात सातत्य नसणं हाही याचाच एक परिणाम. या अस्वस्थतेतही याच मूक सहोदरांनी सांभाळलं, समजून घेतलं. हे सर्व अवशेष मला शतकानुशतके तपश्चर्या करणाऱ्या ऋषीसारखेच वाटतात. या अवशेषांतून हिंडताना ते अधुरे असूनही त्याचं पूर्णपण जाणवत राहिलं. एका विलक्षण उर्मीचा प्रत्यय या अवशेषांतून मिळाला. सिद्धेश्वरसारख्या देखण्या भग्न मंदिरसमुहातून अप्रकट जगण्याचाच मंत्र मिळाला. नितांत सुंदर रांगडय़ा, पण मनस्वी माणिकगडानं कोणत्याही अस्वस्थतेत प्रेमानं जागा दिली. कवडशी, माणिकगड, सिद्धेश्वर यांनी खरोखरच प्रतिकूलतेशी सामना करण्याचं उदाहरणच माझ्यापुढे ठेवलं. अनेक वेळा या स्थानी जाऊनही प्रत्येकच वेळी या स्थानी पुन्हा जाण्याची ओढ वाटत राहते.
लिखाणाच्या निमित्तानं ही सगळी प्राचीन स्थळं पाहता आली. जेवढय़ा जागांवर लिहिलं त्यापेक्षा कितीतरी अधिक जागांवर लिहिणं राहूनच गेलं. या स्थळांना पुन्हा अनुभवतांना त्यांचं सौर्दय, काळ, स्थापत्य, शास्त्र यांचा अभ्यास थोडा फार करता आला, पण तो करताना त्या प्राचीन ऐश्वर्यापुढे माझ्या मर्यादा कळल्या. जे ज्ञात होऊ शकतं त्यापेक्षा कितीतरी अज्ञात आहे, जे जाणवू शकत नाही तिथवर आपण पोहोचूही शकत नाही. त्या काळाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला, जेव्हा हा अवशेष नांदते असतील तेव्हा ते जीवन कसं असेल, याचा विचार करायचा प्रयत्न केला, पण त्यातही मर्यादा लक्षात आली. जे दिसतंय, जाणवतंय ज्या दिव्यत्वाचा, भव्यतेचा प्रत्यय येतो आहे, पदोपदी ज्या अवशेषांच्या सहवासात उचंबळून येतं आहे, काहीतरी अंतर्यात्री ते शब्दात पकडता येत नाहीय, मांडता येत नाहीय, एवढं माझं सामथ्र्य नाही, ही मर्यादा एकवार पुन्हा लक्षात आली. पाण्याच्या शास्त्रीय विश्लेषणापेक्षा पावसात भिजण्याचा, अंगावर पाऊस नोंदवून घेण्याचा अनुभव महत्वाचा, हे समजलं.
गतवर्षी ज्येष्ठ संशोधक रा.चिं. ढेरे यांचं ‘श्री व्यंकटेश्वर आणि श्री कालहस्तीश्वर’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाची सिद्धता होत असताना विदर्भातील काही संदर्भ मी पाठवावेत, असं अरुणा ढेरे यांनी सांगितलं. माझी योग्यता नसताना हे काम करण्याची संधी मिळाली. माझ्या दुर्दैवानं मी पाहिजे तसं काम करू शकलो नाही. तरीही या त्या पुस्तकात आभारपत्रिकेत माझं नाव आलं. ते नाव संजय ऐवजी संजीव असं होतं. हाच आशीर्वाद समजून मी या वर्षी वारसा लिहिताना संजीव हे नाव घेतलं. हा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठा आहे.
जी चार दोन अक्षरं लिहिता आली तेवढीच माझी क्षमता. तरी ‘लोकसत्ता’नं लिहिण्याची संधी दिली. या सदराच्या लिखाणात मी नियमितता राखू शकलो नाही. तरीही मला सांभाळून घेतलं. ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक आभार, कुठेना कुठे दररोज एकेक दगड ढासळतो आहे. शतकानुशतके हे दगड बिनतक्रार उभे आहेत. वर्तमानाचा सामना करत वर्तमानाला आव्हान देत आलेली परिस्थिती प्रसन्नतेनं स्वीकारण्याचं त्यांनीच बळ दिलं. वारसा हे सदर आज संपतंय, पण या अवशेषांची या दगडांची ही साथ मात्र सदैव अशीच राहो. माझं मी पण मला देणाऱ्या सर्वत्र विखुरलेल्या या अवशेषांचे या दगडांचे आभार.