गेल्या चार ते पाच वर्षांपासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ठप्प विकासकामांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार १२ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये पालिका मुख्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे.  पालिकेचा अर्थसंकल्प २५० कोटी रुपयांवरून गेल्या अठरा वर्षांत १५१६ कोटी रुपयांवर गेला आहे. अशा परिस्थितीत शहरात विकासकामांचे डोंगर उभे राहण्याऐवजी कल्याण डोंबिवली शहरे दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. करदात्या नागरिकांना रस्ते, पदपथ या दर्जेदार सुविधा पालिका प्रशासन नागरिकांना देऊ शकत नाही. सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले खासगीकरणातील सर्व प्रकल्प ठप्प आहेत. काही प्रकल्पांच्या माध्यमातून ठेकेदार मलई खात आहेत. त्यामध्ये पालिकेला एक पैशाचाही लाभ होत नाही, असे मनसे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो. पालिकेकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्यांना तडे पडले आहेत. डांबरीकरण, खडीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची केली जातात. वर्षभर नागरिकांना चालायला मिळेल असा रस्ता नसतो. टिटवाळ्यात महावितरणला स्वतंत्र फिडर बसवण्यासाठी जागा देण्यास पालिकेकडून नगररचना विभागाची चूक झाकण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.