* पालिकेच्या नव्या धोरणातून पळवाटा?
* एका इमारतीवर एकच मोबाइल टॉवर!
मानवी आरोग्यावर किरणोत्सर्गाचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी इमारतींच्या गच्चीवर उभारण्यात येणाऱ्या मोबाइल टॉवरसंदर्भात मुंबई महापालिका नवे धोरण आखत असताना त्यातून पळवाटा शोधण्यात मोबाइल कंपन्या गुंतल्या आहेत. तसेच या धोरणातील त्रुटींचा फायदा कसा घेता येईल याचा विचार या कंपन्या करीत आहेत. परिणामी एका इमारतीवर केवळ एकच मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुंबईमधील इमारतींवर सुमारे ५४०० मोबाइल टॉवर उभारण्यात आले असून ३६०० टॉवर्ससाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली आहे. मात्र नियमांना हरताळ फासून तब्बल १८०० अनधिकृत मोबाइल टॉवर इमारतींच्या गच्चीवर आजही दृष्टीस पडत आहेत. त्यातून बाहेर किरणोत्सर्गाची चाचणी करण्याची यंत्रणा आजही महापालिकेकडे नाही. मुंबईकरांच्या आरोग्याची खरोखरच काळजी असेल तर महापालिकेने प्रथम ही यंत्रणा उभारावी, असे मत तज्ज्ञ मंडळींकडून करण्यात येत आहे.
अनेक इमारतींचे मालक अथवा गृहनिर्माण सोसायटय़ांच्या समितीचे सदस्य मोबाइल कंपन्यांकडून मिळणाऱ्या बक्कळ पैशापोटी इमारतीच्या गच्चीवर मोबाइल टॉवर बसवून घेतात. मात्र आता इमारतींच्या गच्चीवर मोबाइल टॉवर बसविण्यासाठी ७० टक्के भाडेकरूंची परवानगी आवश्यक असणार आहे. तसेच इमारतीच्या बांधकाम क्षमतेबाबतचे पालिकेचे प्रमाणपत्रही यापुढे सक्तीचे करण्यात येणार आहे. ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारावयाचा असल्यास तिच्या बांधकाम क्षमतेचे प्रमाणपत्र दर पाच वर्षांनी सादर करावे लागणार आहे. ३६ मीटर परिसरातील दुसऱ्या इमारतीवर मोबाइल टॉवर उभारता येणार नाही. तसेच शाळा, महाविद्यालय, रुग्णालयांच्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारता येणार नाहीत. नव्या धोरणातील या अटींमुळे भाडेकरूंना दिलासा मिळाला आहे. मात्र नव्या धोरणानुसार एका इमारतीवर दोन मोबाइल टॉवर उभारता येणार आहेत. एका टॉवरवर चार याप्रमाणे दोन टॉवरवर आठ एन्टिना मोबाइल कंपन्यांना उभारता येतील. तसे झाल्यास सध्याच्या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे एका इमारतीवर केवळ एकच मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तज्ज्ञ मंडळींकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर कारागृह तसेच पुरातत्त्व वारसा वास्तूंबाबत या धोरणात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात कारागृहाच्या आसपास ५०० मीटर, तर पुरातत्व वारसा वास्तूच्या आसपास १०० मीटर परिसरात मोबाइल टॉवर उभारण्यास मनाई आहे. मात्र याकडे पालिकेच्या धोरणात दुर्लक्ष झाल्याचे समजते.
मोबाइलच्या वापरात प्रचंड प्रमाणात वाढ होत असून मोबाइल टॉवरच्या उभारणीसाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मोबाइल टॉवर उभारण्याच्या उभारणीसाठी परवानगी मिळावी याकरिता महापालिकेकडे १००० अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र जोपर्यंत नव्या धोरणाला अंतिम स्वरूप प्राप्त होऊन त्यास पालिका सभागृहाची मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत नवीन मोबाइल टॉवर उभारणीला परवानगी द्यायची नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.