रविवार कारंजा परिसरात किराणा मालाचे दुकान फोडून खाद्य पदार्थ टेम्पोद्वारे लंपास करण्याची घटना सोमवारी मध्यरात्री पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात घडली. वैश्य डिस्ट्रिब्युटर्सचे गोदाम फोडून चोरटय़ांनी ४० लाखांहून अधिक किमतीचा माल टेम्पोत भरून लंपास केला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती रविवार कारंजा परिसरातील व्यापारी संकुलातील घाऊक किराणा मालाची दुकाने काही चोरटय़ांनी पहाटेच्या सुमारास फोडली होती. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात त्यांच्या हालचाली बंदिस्त झाल्या. या घटनेमुळे व्यापारी वर्गात अस्वस्थता पसरली असताना सोमवारी मध्यरात्री तसाच प्रकार पंचवटी कारंजालगत घडला. मालेगाव मोटार स्टँड परिसरातील सीपी टॉवर संकुलात हा प्रकार घडला. वैश्य डिस्ट्रिब्युटर्सच्या शटर्ससमोर संशयितांनी मालमोटार उभी केली. कटरच्या साहाय्याने शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. सीसी टीव्ही कॅमेरा, त्याच्या संबंधित रेकॉर्डिग व साहित्य प्रथम चोरटय़ांनी उद्ध्वस्त केले. मग, त्यांचा मोर्चा गोदामाकडे वळला. सिगारेटचे नामांकित कंपन्यांचे ४० बॉक्स मालमोटारीत टाकण्यात आले. कॅश काऊंटरच्या दालनातील कप्प्यातून पैसे काढण्यासाठी तो भाग विलग करून काढून नेला. या धाडसी चोरीत ४० लाखांहून अधिक किमतीचा माल लंपास झाला. या प्रकरणी सुरेश वैश्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. श्वान पथकाच्या मदतीने चोरटय़ांचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महापौर अशोक मुर्तडक यांनी घटनास्थळी भेट देऊन वैश्य यांच्याशी चर्चा केली. मध्यरात्री ही घटना घडल्याने स्थानिकांना चाहूल लागली नाही. व्यापारी संकुलात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.