सासुरवाडीला गेल्यावर पत्नीस नांदवण्यासाठी घेऊन जाण्याचा हेका धरल्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान जावयाच्या हत्येत झाल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील साकुरीछाप येथे घडला. या प्रकरणी पत्नीसह सहा जणांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
दत्ता तान्हाजी पवार (३०) असे हत्या झालेल्या जावयाचे नाव असून तो तालुक्यातील गिगाव येथील रहिवाशी होता. तीन वर्षांपूर्वी साकुरी येथील वर्षां या तरूणीशी त्याचा विवाह झाला. मात्र लग्नानंतर उभयतांमध्ये वाद निर्माण झाल्याने वर्षां माहेरी निघून आली होती. ती सासरी जाण्यास नाखूष होती. तरी दत्ताचा तिला वागवण्याचा आग्रह कायम होता. त्यासाठी तिला नांदवण्यास नेण्यासाठी सासुरवाडीला गेला होता. तेथे पत्नीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला. त्यातून लोखंडी गज, लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दत्ताचा मृत्यू झाला.
तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी सासरा सोमनाथ बापू धोंडगे, पत्नी वर्षां पवार, समाधान धोंडगे आदी सात जणांविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.