राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, विद्यापीठातील कल्याणकारी योजना केवळ मुठभर विद्यार्थ्यांनाच प्राप्त होतात. त्यामुळेच अनेक विद्यार्थी आर्थिक गरज असतानाही विद्यापीठातील योजनांपासून पर्यायाने शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली जाते. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात योजनांचा प्रचार आणि प्रसार विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्यामार्फत होत नसल्याने विद्यार्थी योजनांपासून वंचित राहतात.
नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी कल्याण निधी आणि विद्यार्थी सहायता निधी या दोन्ही स्वतंत्र योजना विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही लागू आहेत. विद्यार्थी कल्याण निधी या योजनेंतर्गत कमवा व शिका, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये विजेते व उपविजेते पद प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी उपयोगात आणला जातो. तसेच विद्यार्थ्यांला वैद्यकीय सहायता करणे, एखाद्या विद्यार्थ्यांला भरपाई अथवा मोबदला देण्यासाठीही या निधीचा उपयोग होतो. त्याचबरोबर विद्यार्थी सहायता निधी योजनेंतर्गत शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तक खरेदी खर्च व वैद्यकीय खर्च इत्यादी प्रकारचे आर्थिक सहाय्य पात्र विद्यार्थ्यांना करण्यात येते.
यापैकी विद्यार्थी कल्याण निधीतून गेल्यावर्षी पाच महाविद्यालयांच्या २५ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला तर विद्यार्थी सहायता निधीतून २०१३-१४मध्ये ४२ महाविद्यालयातील २७४ विद्यार्थ्यांना तर २०१४-१५मध्ये ५६ महाविद्यालयातील ५३० विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. याविषयी विधिसभेत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले.
मात्र, २०१३मध्ये अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून गेल्यावर्षी आदल्यावर्षीच्या तुलनेत सहायता निधीच्या लाभार्थीची संख्या वाढलेली दिसते. तरीही चार लाख विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या केवळ १.३ टक्के म्हणजे फारच अल्प आहे. लाभार्थीची संख्या वाढून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे. मात्र, महाविद्यालयांकडून ही माहिती विद्यार्थ्यांंपर्यंत पोहोचवलीच जात नसल्याची माहिती विधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी दिली.
चंद्रपूर जिल्हातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कल्याण आणि सहायता निधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडे पाठपुरावा करतो. मात्र, गुळगुळीत उत्तरे दिली जातात. शिवाय लिपिक मंडळींना याविषयी फारसे देणेघेणे नसते. या योजना विद्यार्थ्यांपर्यत पोहोचवणार नाही, असा विडाच त्यांनी उचललेला असतो. विद्यापीठाने दरवर्षी प्रवेशाच्या प्रमाणात ठराविक विद्यार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवलाच पाहिजे, असा नियम करायला हवा, असे ते म्हणाले.

प्राप्त निधी कमी, खर्च जास्त
२०१३-१४ मध्ये विद्यार्थी कल्याण निधीसाठी विद्यार्थ्यांचे २४ लाख ८५ हजार रुपये तर विद्यार्थी सहायता निधीपोटी एकूण ३० लाख ३८ हजार रुपये शुल्काच्या रूपाने विद्यापीठाला प्राप्त झाले. तसेच वर्ष २०१४-१५मध्ये कल्याण निधीसाठी १३ लाख ३६ हजार आणि सहायता निधीसाठी १४ लाख २१ हजार विद्यापीठाला प्राप्त झाले. प्राप्त शुल्कापोटी २०१३-१४मध्ये एकाही विद्यार्थ्यांने विद्यार्थी कल्याण निधीचा लाभ घेतला नाही. मात्र, विद्यार्थी सहायता निधीतून १४ लाख ४६ हजार ९९७ एवढा निधी २७४ विद्यार्थ्यांवर खर्च करण्यात आला. तसेच २०१४-१५मध्ये २५ विद्यार्थ्यांवर ११ लाख ६३ हजार ६८८ एवढा निधी खर्च करण्यात आला असून ५३० विद्यार्थ्यांवर २३ लाख ७४ हजार ७४८ एवढा विद्यार्थी सहायता निधी खर्च करण्यात आला. आश्चर्य म्हणजे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांकडून जमा झालेला निधी फक्त १४ लाख २१ हजार असताना खर्च सुमारे २३ लाख, ७४ हजार झाला आहे.