राज्य निवडणूक आयोगाने अनेक वेळा आदेश देऊनही मतदार यादी तयार न करणाऱ्या औरंगाबाद पालिकेमुळे नवी मुंबई पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास आयोगाला दिरंगाई होत असल्याचे आढळून आले आहे. नवी मुंबई पालिकेने तीन दिवसांपूर्वी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, परंतु औरंगाबाद महापालिकेने तेही अद्याप न केल्याने आचारसंहिता जाहीर करण्यात अडचण येत आहे. या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील २६ महानगरपालिकांपैकी औरंगाबाद महापालिकेची मुदत २७ एप्रिल रोजी, तर नवी मुंबई महापालिकेची मुदत ८ मे रोजी संपत आहे. त्यापूर्वी सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद आणि नवी मुंबई पालिकेला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात या दोन्ही पालिकांतील प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावरील हरकती, सूचनांचे सोपस्कारदेखील पूर्ण झाले आहेत.
आता आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना या दोन्ही पालिकांना एकाच वेळी दिल्या आहेत. १२ मार्च रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्याची सूचना दिल्यानंतर नवी मुंबई पालिका प्रशासनाने सहा दिवसांत ह्य़ा मतदार याद्या प्रभागनिहाय वेगळ्या केल्या आहेत. त्यात काही उणिवा राहिल्या आहेत, पण २३ मार्चपर्यंत त्याही दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेचे अधिकारी-कर्मचारी हे रात्रंदिवस काम करीत आहेत. याउलट औरंगाबाद पालिकेचा कारभार आस्ते कदम चालल्याने अद्याप मतदार यादी प्रसिद्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे नवी मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब लागत आहे. शुक्रवार, शनिवार, रविवारी औरंगाबाद प्रशासन हे काम पूर्ण करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून सोमवारी दोन्ही पालिकांसाठी आचारसंहिता आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवारांचा जीव कासावीस झाला आहे. कार्यक्रम घेतला आणि त्याच दिवशी आचारसंहिता लागल्यास सर्व खर्च फुकट जाण्याच्या भीतीने उमेदवार आचारसंहितेच्या प्रतीक्षेत आहेत.