नवी मुंबईत पोलीस आणि पालिका प्रशासनाला नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कसे जुमानत नाहीत याचे एक उत्तम उदाहरण तळवली नाक्यावर दिसून येत असून या वसाहतीतून जाणाऱ्या अंर्तगत रस्त्यात चक्क दोन नवरात्रोत्सव मंडळाने केवळ दोनशे मीटरच्या अंतरात दोन भव्य मंडप टाकले आहेत. त्यामुळे रस्त्याची संपूर्ण एक मार्गिका अडवण्यात आली असून याकडे हाकेच्या अंतरावर असणारे रबाले पोलीस ठाणे व घणसोली प्रभाग अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
नवी मुंबईतील आठ प्रभाग अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक ठिकाणी फेरीवाले, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे व झोपडय़ा, डेब्रिज यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. या अधिकाऱ्यावर प्रशासनाचा अजिबात अंकुश राहिलेला नसून राज्यकर्त्यांनी तर ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ तत्त्व स्वीकारून या अधिकाऱ्याबरोबर हातमिळवणी केल्याचे चित्र आहे. गणेशोत्सव काळात रस्ते हडप करणाऱ्या गणेशोत्सव मंडळानंतर आता नवरात्रोत्सव मंडळांनी संपूर्ण रस्त्यावर मंडप घालण्याचा पायंडा कायम ठेवला आहे. नवी मुंबईत शंभर एक नवरात्रोत्सव साजरे होणार असून यावर्षी इच्छुक उमेदवाराच्या मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर या नवरात्रोत्सवांवर चार चाँद लागणार आहेत. त्यामुळे अनेक पक्षाच्या छत्रछायेखाली चालणाऱ्या या मंडळांनी विद्युत रोषणाईसाठी दुतर्फा रस्ते खोदण्याचा जन्मसिद्ध हक्क बजावला आहे.
ऐरोली सेक्टर आठमधील एका गणेशोत्सव मंडळाने तर पालिकेने लावलेले दिशा, सूचना फलक काढून भंगार मध्ये विकले, पण याचा प्रभाग अधिकाऱ्यांना पत्ता नाही. या सर्व अनधिकृत आणि अतिक्रमणाकडे पालिका प्रभाग अधिकारी जाणूनबुजून कानाडोळा करीत असून पालिकेची अनेक वर्षे ‘सेवा’ करून थकलेले भागलेले अधिकारी आला दिवस ढकलत आहेत. पालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळून आता एक वर्ष होत आलेल्या आबासाहेब जऱ्हाड यांचीही जरब आता जिरली असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या अधिकाऱ्यांना धारेवर धरेल याची अपेक्षा करणे गैर झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईत सर्वत्र सावळागोंधळ सुरू असल्याचे दृश्य असून फेरीवाले अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, गावठाणातील फिफ्टी फिफ्टीची कामे मोठय़ा प्रमाणात वाढली आहेत. वरकरणी चांगली दिसणारी नवी मुंबई दिवसेंदिवस आतून पोखरत जात असल्याचे चित्र आहे; पण याचे पालिका किंवा पोलीस प्रशासनांना काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.