ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी रस्ते महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून चांगले रस्ते निर्माण करतानाच त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडेही लक्ष पुरवावे, असे आदेश केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी दिले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या सहा जिल्ह्यांतील कामांची आढावा बैठक शुक्रवारी भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, खा. हेमंत गोडसे, ए. टी. पाटील, आ. रक्षा खडसे, ग्रामविकास विभागाचे सहसचिव दीपक मोरे, मुख्य अभियंता पी. बी. रणभोर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा २०१३ मध्ये सुरू झाल्याचे भगत यांनी नमूद केले. राज्यात योजनेतून आतापर्यंत २२ हजारहून अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत दोन हजार ६१८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी मंजूर निधीचा हप्ता राज्याला देण्यासाठी केंद्र सरकार पातळीवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. योजनेतून तयार होणारे रस्ते चांगल्या स्थितीत राहण्यासाठी यंत्रणांनी कामांवर विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सूचित केले. बैठकीच्या सुरुवातीला नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, ठाणे जिल्ह्य़ातील योजनेच्या कामांची माहिती देण्यात आली.